शैलजा तिवले
एकीकडे राज्य सरकारने टाळेबंदीचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे तर दुसरीकडे संपूर्ण आरोग्यव्यवस्था करोनाकेंद्री झाली आहे. परिणामी आरोग्याच्या बहुतांश सेवा खंडित झाल्या आहेत. याचे दूरगामी परिणाम लक्षात घेता यातून वेळीच मार्ग काढणे का गरजेचे आहे, यावर प्रकाश टाकणारी ही मालिका..
राज्यात २२ मार्चपासून टाळेबंदी लागू केल्यापासून गर्भवतींच्या नियमित तपासण्या बंद झाल्या आहेत. जोखीम असलेल्या मातांचे निदान, बाळातील व्यंग, वजन, वाढ याबाबतच्या तपासण्या आणि नंतरचे धोक्यांचे निदान करून वेळीच उपचार न केल्यास माता आणि बाळ या दोघांच्याही प्रकृतीवर गंभीर परिणामांची शक्यता आहे.
गर्भवतींच्या पहिल्या तीन महिन्यांतील तपासण्या महत्त्वाच्या असतात. मधुमेह, थायरॉईड इत्यादी आजारांच्या चाचण्या न झाल्यास बाळाच्या वाढीवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच बाळात व्यंग आहे का याची तपासणीही त्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते; परंतु सध्या या चाचण्या पूर्णत: थांबल्याने प्रसूतीदरम्यान धोका निर्माण होण्याची किंवा बाळाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याबाबत काही उपाययोजना आखणे नितांत आवश्यक असल्याचे शीव रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. राहुल मयेकर यांनी सांगितले.
कमी वजन, रक्तक्षय, उच्च रक्तदाब, मधुमेह यानुसार जोखमीच्या मातांचे निदान केले जाते आणि आवश्यक ती दक्षता घेतली जाते. तसेच शेवटच्या काही महिन्यांमध्ये सोनोग्राफी, डॉपलर चाचणीद्वारे बाळाचे वजन, वाढ, हृदयाचे ठोके यांचा सातत्याने आढावा घेतला जातो. यामध्ये काही धोका वाटल्यास तातडीने प्रसूती केली जाते. सध्या या चाचण्या होत नसल्याने मातेला असलेला धोका ओळखता आला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात, अशी भीती डॉ. मयेकर यांनी व्यक्त केली.
नियमित तपासण्या बंद असल्या तरी काही उपाययोजना करून मातांच्या आरोग्याचा पाठपुरावा करणे शक्य असल्याचे वाडिया रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती नाडकर्णी यांनी सांगितले. डॉ. नाडकर्णी म्हणाल्या, ‘वाडिया रुग्णालयात नोंद केलेल्या सर्व मातांच्या आरोग्याचा आढावा दूरध्वनीवरून ठरावीक कालावधीने घेतला जातो. तसेच सरकारनेही आता सोनोग्राफी केंद्र दिवसांतून तीन ते चार तास खुले ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घराजवळील केंद्रांमध्ये सोनोग्राफी करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. त्यांच्या अहवालांची माहिती आम्हाला फोनवरून दिली जाते. अहवालात काही धोकादायकआढळल्यास त्यांना रुग्णालयात बोलावले जाते.’
जे.जे. रुग्णालयातही आता स्त्रीरोग विभागाच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. तेथे संपर्क साधल्यास योग्य ते मार्गदर्शन केले जाईल, असे जे.जे. रुग्णालयाचे स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले.
शहरांमध्ये काही उपाययोजना उपलब्ध असल्या तरी गावांमध्ये आशा सेविकांपासून आरोग्य क्षेत्रातील सर्वच जण करोना प्रतिबंधाच्या कामामध्ये गुंतल्याने मातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे आरोग्य केंद्रांवरील डॉक्टरांनी लक्ष वेधले.
मातांना धोक्याच्या सूचना
* दर आठवडय़ाला किंवा १५ दिवसांनी वजन करावे. वजनात मोठय़ा प्रमाणात घट होत असल्यास तातडीने डॉक्टरांना भेटावे.
* अंगठी किंवा जोडवी घट्ट होत असल्यास सूज आल्याचे समजावे. पायाखाली उशी ठेवूनही सूज कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* अधूनमधून तीव्र प्रमाणात डोकेदुखी असेल, चक्कर येत असेल किंवा अंधारी येत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
* सुका खोकला, अंगदुखी आणि ताप अशी करोनाची लक्षणे असल्यास सहाव्या किंवा सातव्या दिवशी चाचणी करावी.
बाळासाठी महत्त्वाचे
* गर्भवतींनी बाळाच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवावे. ल्ल सकाळची न्याहरी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण केल्यानंतर साधारणपणे एक तासात बाळ किती वेळा फिरते याची नोंद करावी.
* दिवसातून साधारणपणे ५ ते ६ वेळा बाळाची हालचाल होत असेल तर त्याची वाढ योग्य रीतीने होत आहे.
* बाळ अशक्त होत असेल तर त्याची हालचाल कमी होते. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.