डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन जवळ येऊ लागला तसा विविध दलित संघटनांनी इंदू मिल जमीन हस्तांतरणाच्या व स्मारकाच्या प्रश्नावर वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय करावा, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा दिल्ली वारी करण्याचे आश्वासन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांना दिले.
काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड यांनीही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन आंबेडकर स्मारकाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी त्यांना विनंती केली. गायकवाड यांनी मुख्यमंत्रयांशीही याच प्रश्नावर चर्चा केली. त्यांनीही दिल्लीत जाऊन आपण स्वत जमीन ताब्यात मिळण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.
इंदू मिलच्या जमीनीवर आंबेडकर स्मारक उभारण्याची घोषणा होऊन दोन वर्षे होत आली तरी, त्याबाबत भरीव असे काहीच काम झालेले नाही. सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवारी इंदू मिलचा ताबा घेण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही ५ डिसेंबरपूर्वी स्मारकाचे भूमीपूजन केले नाही तर ६ डिसेंबरलाच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात बुधवारी रात्री रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, अ‍ॅड. संघराज रुपवते, काशिनाथ निकाळजे, प्रा. रमाकांत यादव आदींनी मुख्यमंत्रयांची भेट घेऊन इंदू मिल जमीन हस्तांतरण व आंबेडकर स्मारकाबाबत लवकरात लवकार निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर इंदू मिलच्या जमिनीवर बाबासाहेबांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे उत्तम स्मारक बांधण्यास सरकार वचनबद्ध आहे, चांगले काम होण्यासाठी थोडा विलंब लागेल, परंतु त्यासाठी सर्वानीच संयम राखला पाहिजे, असे मुख्यमंत्रयांनी आवाहन केले. आपण स्वत दिल्लीला जाऊन जमीन हस्तांतरणाबाबत मंत्रिमंडळात लवकर निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. काही दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.