मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा वाहतूक सेवेत दाखल असून आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक – कफ परडे टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. सध्या वाहतूक सेवेत दाखल असलेल्या टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी संख्या वाढविण्यासाठी खासगी फिडर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला आहे. त्यानुसार मेट्रो ३ मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांवर फिडर बस सेवा सुरू करण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. फिडर सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मेट्रो स्थानकत उतरल्यानंतर इच्छितस्थळी पोहचणे सोपे होणार आहे. मेट्रो स्थानक आणि नजिकच्या रेल्वे स्थानकादरम्यान ही फिडर सेवा असण्याची शक्यता आहे.
एमएमआरसीच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा १ ऑक्टोबर २०२४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाली असून त्यामुळे आरे – वरळी प्रवास अतिजलद झाला असला तरी या मार्गिकेला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दैनंदिन प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान एमएमआरसीसमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी एमएमआरसीकडून प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून एमएमआरसीने आता मेट्रो स्थानकांबाहेर फिडर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २६ मेट्रो स्थानकांबाहेर ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत प्रवाशांना सुकरपणे पोहचता यावे वा मेट्रो स्थानकापासून इच्छितस्थळी पोहचणे सोपे व्हावे यासाठी फिडर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ॲपवर आधारित खासगी बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे. अशी बस सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागविण्यात आल्या आहेत.
चलो बस, सिटी फ्लोसारख्या खासगी बस सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी मेट्रो स्थानकांबाहेर फिडर बस सेवा सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी अशा सेवेचा उपयोग होऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित करीत एमएमआरसीने फिडर बस सेवेसाठी स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रियेअंती नियुक्त करण्यात येणाऱ्या कंपनीकडून बस सेवेचे मार्ग, तिकीट दर निश्चित केले जातील. यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. मात्र शक्य तितक्या लवकरच ही सेवा सुरू करून प्रवाशांचा मेट्रो स्थानकापासून इच्छितस्थळादरम्यानचा प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न असल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात आले. ही बस सेवा कमी अंतराची, साधारण ३ ते ५ किमी अंतराची असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.