आरे काॅलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या मुद्द्यावरुन ट्विटवर #AareyForest हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. अनेकांनी यासंदर्भात आपला आक्षेप नोंदवला आहे. या ट्रेण्डमध्ये पर्यावरणवाद्यांनी रात्रीच आरेकडे रवाना झाले आहेत. तसेच इतरांनीही तातडीने आरे कारशेडच्या ठिकाणी पोहचावं असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिथं येताना सोबत काय काय आणावं याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. पाणी, खाद्यपदार्थ, बॅटरी, मोबाईल चार्जर बॅटरी, चटई, चादरी आदी सामान घ्यावं तसेच सोबत पर्यावरणवादी मित्रमंडळींनाही सोबत आणावं असं आवाहन करण्यात येत आहे. इतकंच नाही तर आरेमध्ये येण्यासाठी कुठल्या स्थानकावरून यावं कसं पोचावं यासह हेल्पलाईन नंबरही देण्यात येत आहेत. या एकंदर तयारीवरून कारशेडविरोधी मोठ्या प्रमाणात जमवाजमव करत असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.

आरे येथील मेट्रोच्या प्रकल्पा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या असून राज्य सरकार आणि मुंबई रेल मेट्रो कॉर्पोरेशनला दिलासा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री आठपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली.  आरेतील अनेक झाडे इलेक्ट्रिक करवतीने झाडे तोडली गेली. यामुळे स्थानिकांना आरेतील झाडे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर लगेच काही तासांमध्ये तोडली जात असल्याचे समजले. यानंतर रात्रीच्या अंधारातही मोठ्या संख्येने नागरिकांनी आरे मेट्रो कारशेडच्या जवळ गर्दी केल्याचे पहायला मिळाले. वृक्षतोड करण्याआधी या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वृक्षतोड होत असलेल्या ठिकाणी स्थानिकांना जाऊ दिले नाही. स्थानिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी कारशेडच्या परिसराच्या बाहेर लावण्यात आलेल्या गेटवरच ‘आरे वाचवा’ची घोषणाबाजी सुरु केली. आरेमधील झाडे वाचवण्यासाठी नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये चांगलीच वादावादी झाली. सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याआधीच झाडे तोडल्याने नागरिकांनी राज्य सरकार, एमएमआरसीएल विरोधात संताप व्यक्त केला.

दरम्यान मेट्रो प्रशासनाने सुरु केलेल्या वृक्षतोड मोहिमेत काही तासांमध्ये २०० हून अधिक झाडे कापण्यात आली आहेत. पर्यावरणप्रेमींनी रात्री आरेमध्ये आंदोलन सुरु केले आहे.