मुंबई : वांद्रे पूर्व येथील निर्मलनगर येथील संक्रमण शिबिराच्या दोन इमारती नुकत्याच म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पनर्रचना मंडळाकडून रिकाम्या करुन घेण्यात आल्या आहेत. या कारवाईला विरोध करणाऱ्या रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर संसार थाटला होता. आता त्यांना रस्त्यावरुनही हुसकावून लावण्यात आले आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या संक्रमण शिबिरार्थींनी आता इतर ठिकाणी संक्रमण शिबिरात न जाता निर्मलनगरमध्येच पुनर्वसित इमारतीत कायमस्वरुपी ५५० चौ. फुटाची घरे देण्याची मागणी केली आहे. किती वर्षे आम्ही संक्रमण शिबिरार्थी म्हणून राहणार असा प्रश्न विचारून आता या मागणीसाठी न्यायालयीन लढाईची तयारीही सुरु केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संक्रमण शिबिरार्थी म्हणूनच वर्षानुवर्षे राहणार. हे किती वर्षे चालणार. म्हाडाने, राज्य सरकारने संक्रमण शिबिरार्थींना कायमस्वरुपी घरे देण्यासाठी नवीन ठोस धोरण आणणे गरजेचे आहे असे म्हणत आम्हाला निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी द्या अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.

हेही वाचा…अबुधाबीहून मुंबईत येणाऱ्या विमानात प्रवाशाकडून धुम्रपान, सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निर्मलनगर अभिन्यासाचा पुनर्विकास एका खासगी विकासकाकडून केला जात आहे. या पुनर्विकासात दुरूस्ती मंडळाच्या अखत्यारितील इमारत क्रमांक ९ आणि १० अशा संक्रमण शिबिराचाही समावेश केला आहे. संक्रमण शिबिराचा समावेश पुनर्विकासात करताना दुरूस्ती मंडळाने येथील संक्रमण शिबिरार्थांनी इतर ठिकाणी संक्रमण शिबिराचे गाळे वितरीत केले आहेत. मात्र संक्रमण शिबिरार्थींनी त्याला विरोध करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी २ जानेवारीला होणार आहे. मात्र त्यापूर्वीच दुरूस्ती मंडळाने पोलीस बळाचा वापर करून ८० खोल्या रिकाम्या केल्या आहेत. यातील अंदाजे २५ खोल्यातील कुटुंबांनी दुरूस्ती मंडळाच्या या कारवाईला विरोध करून संक्रमण शिबिर नाकारत रस्त्यावर संसार मांडला होता. मात्र आता या रहिवाशांना रस्त्यावरुनही हुसकावून लावण्यात आले आहे. या रहिवाशांनी आपली पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती माजी नगरसेवक अॅड मनमोहन चोणकर यांनी दिली आहे. आम्ही पर्यायी व्यवस्था केली असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही पुन्हा संक्रमण शिबिरात जाणार नाही अशी भूमिकाही मोठ्या संख्येने तेथील संक्रमण शिबिरार्थींची असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनात पुन्हा धक्काबुक्की, खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आम्ही घुसखोर नाही, आम्ही अतिक्रमण केलेले नाही. रस्त्यावर झोपडी बांधणाऱ्याला कायमस्वरुपी हक्काचे घर दिले जाते. अशावेळी आम्ही उपकरप्राप्त इमारतीतील मूळ भाडेकरु असताना गिरगाव, दादर सारख्या परिसरातील मूळ रहिवासी असताना तुम्ही आम्हाला संक्रमण शिबिरात आणता, ४०-४० वर्षे संक्रमण शिबिरात ठेवता. संक्रमण शिबिरातील रहिवाशांना कायमस्वरुपी घरे देण्यासाठी कोणतेही ठोस धोरण आणत नाही आणि वेळ आली की आम्हाला संक्रमण शिबिरातून बाहेर काढून दुसऱ्या संक्रमण शिबिरात टाकता. हे किती वर्षे चालणार असा प्रश्न निर्मलनगरमधील संक्रमण शिबिरार्थींनी उपस्थित केला आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा संक्रमण शिबिरात जाणार नाही, आता आम्ही निर्मलनगर पुनर्विकासातच आम्हाला पुनर्वसित संक्रमण शिबिराच्या २३ मजली इमारतीत कायमस्वरुपी घरे द्यावीत अशी मागणी उचलून धरणार असल्याचेही चोणकर यांनी सांगितले. या मागणीसाठी तसेच संक्रमण शिबिरार्थींच्या वर्षानुवर्षाच्या अवहेलनेविरोधात लवकरच न्यायालयात धाव घेण्याचा विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. निर्मलनगरसह मुंबईतील संक्रमण शिबिरार्थींना संक्रमण शिबिरार्थी अशी ओळख पुसून कायमस्वरुपी हक्काची घरे हवी आहेत. त्यामुळे न्यायालयीन लढाईत इतर संक्रमण शिबिरार्थीही सहभागी होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protestors evicted aggressive transit campers demanded 550 sq ft houses in nirmalnagar mumbai print news sud 02