कोठारी, विठ्ठल कोळी आणि सर कावसजी जहांगीर पाणपोईचे संवर्धन
मुंबईने मिळवून दिलेल्या ऐश्वर्याची जाण ठेवत अनेक वर्षांपूर्वी तत्कालीन धनिक मंडळींनी शहरात विविध भागांत उभारलेल्या पाणपोयांचा येत्या काही वर्षांत जीर्णोद्धार केला जाणार आहे. सध्या दुर्लक्षित असलेल्या या जुनाट पाणपोयांचे संवर्धन करून त्या पुन्हा उपयोगात आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. या मोहिमेअंतर्गत फोर्ट परिसरातील देवीदास प्रभूदास कोठारी प्याऊ येत्या काही महिन्यांत पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच प्रभादेवी परिसरातील आनंद विठ्ठल कोळी प्याऊ आणि काळाचौकी येथील सर कावसजी जहांगीर पाणपोईचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
वाटसरू तसेच कष्टकऱ्यांना पिण्याचे पाणी थंड व सहज उपलब्ध व्हावे, यासाठी पूर्वीच्या काळी मुंबईत अनेक ठिकाणी पाणपोया उभारण्यात आल्या होत्या. मात्र, बाटलीबंद पाणी तसेच पाण्याची सहज उपलब्धता झाल्यानंतर या पाणपोयांकडे दुर्लक्ष होऊ लागले. आता तर यातील अनेक पाणपोयांवर मातीचे थर साचू लागले आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीत अशा २९ पाणपोया आहेत. या पाणपोयांचे संवर्धन करण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. काही वर्षांपूर्वी मस्जिद बंदर येथील भातबाजारातील केशवजी नाईक आणि हॉर्निमन सर्कल येथील मनकुवरबाई रणदास प्याऊच्या संवर्धनाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आता फोर्ट परिसरातील देवीदास प्रभूदास कोठारी प्याऊचे काम पूर्णत्वास नेण्यात येत आहे. यासाठी ‘वास्तु विधान प्रोजेक्ट’ या पुरातन वास्तूंचे संवर्धन करणाऱ्या कंपनीचे मार्गदर्शन घेतले जात आहे. मुंबईतील पुरातन वास्तूंचे निरीक्षण करून त्यांच्या संवर्धन प्रकल्पाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली.
कोठारी पाणपोयीची बांधणी १९२३ साली करण्यात आली होती. सोबतच पाणीपोईच्या मागील बाजूस कबुतरखाना देखील उभारण्यात आला होता. सध्या या पाणपोईला पुन्हा मूळ रूप देण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाणपोयीच्या शेजारी ‘प्याऊ सर्किट’ नकाशा लावून मुंबईत अस्तिवात असणाऱ्या पाणपोयांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच प्याऊच्या आवारामध्ये गॅस बत्ती लावणाऱ्या माणसाचे शिल्प तयार करण्यात आले आहे. .
कलाकृती नव्याने
कोठारी पाणपोयीभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे तिच्या मूळ वास्तूला धक्का बसला होता. शिवाय सातत्याने झालेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वास्तूचा मूळ पाया आणि हद्द विलुप्त झाल्याची माहिती ‘वास्तु विधान प्रोजेक्ट’चे वास्तुतज्ज्ञ राहुल चेंबूरकर यांनी दिली. त्यामुळे सर्वप्रथम पाया आणि त्याची हद्द सीमा मूळ स्वरूपात आणण्याचे काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणपोयीच्या मूळ वास्तूवरील कलाकृतींची नासधूस झाल्याने कुशल कारागिरांकडून या कलाकृती नव्याने बनवून घेण्यात आल्याचे चेंबूरकर म्हणाले.