मुंबई : राज्यातील पहिले समूह विद्यापीठ ठरलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाला अखेर पूर्णवेळ कुलगुरू मिळाले असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागात वरिष्ठ प्राध्यापक डॉ रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी डॉ. कामत यांची नियुक्ती केल्याचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस्सी. केले असून गोवा विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये १६४ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर १५ पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. अध्यापन, संशोधन व प्रशासकीय कामकाज हाताळणीचा व्यापक अनुभव कामत यांना आहे.  छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अनुपम शुक्ल व शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता यांच्या समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कामत यांची निवड केली. 

राज्य शासनाने २०१८ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय व शासकीय विज्ञान संस्था या चार संस्थांचे मिळून डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठ स्थापन केले. मात्र तेव्हापासून विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरूंची नियुक्ती होऊ शकली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnish kamat appointed vice chancellor of homi bhabha state university zws