मुंबई: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुरवातीला दोन महिन्यांचे पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले. पण आता हे पैसे येण्याचे बंद झाले आहे. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरत असल्याचे सांगत भाजपचे राम कदम यांनी शुक्रवारी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.
विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे कदम यांनी ही गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणताना, सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अतिशय क्रांतिकारी योजना सुरू केली. लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला. घाटकोपरमधील स्थानिक आमदार आपण प्रत्येक घरातून अर्ज भरून घेतले.
सुरुवातीला दोन महिन्यांचे त्यांना पैसे आले. काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले. नंतर पैसे येण्याचे बंद झाले. त्यांचे आधारकार्ड बँकेला लिंक आहे. पण या संदर्भात काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे का येत नाहीत. हे कळायला हवे. त्यासाठी कोणते तरी संकेतस्थळ असावे. ज्याच्यावर नाव टाकले तर पैसे येणार आहेत की नाही , पैसे न येण्याचे काय कारण आहे. त्याचे कारण कळले पाहिजे. अशी मागणी कदम यांनी केली.