मुंबई : राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाहीत, त्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय परिचर्या परिषदेने प्रवेशाची अंतिम तारीख ३१ ऑक्टोंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी आणखी एक संधी देत बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी ५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी भारतीय परिचर्या परिषदेने पात्रता निकषामध्ये बदल केला. यानुसार पूर्वी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ५० पर्सेंटाईल गुणांची अट काढून टाकण्यात आली. यानुसार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषामध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बदल करण्याचा निर्णय घेतला.
प्रवेशासाठी असलेली ५० पर्सेंटाईल गुणांची अट काढून टाकल्याने ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटी दिलेली आहे, असे सर्व विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र ठरले आहेत. शिथिल केलेल्या पात्रतेमुळे या अभ्यासक्रमासाठी इच्छुक अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे. या सुधारित पात्रतेची संधी शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
प्रवेशासाठी नवीन नोंदणी सुरू
ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी नर्सिंगची सीईटी दिलेली आहे पण ५० पर्सेंटाईल गुण न मिळाल्याने त्यांना सीईटी प्रवेशाचा अर्ज करता आला नाही. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करता यावी यासाठी सीईटी कक्षाच्या http://www.mahacet.org संकेतस्थळावर नोंदणीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी अपूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील आपली प्रवेशाची नोंदणी पूर्ण करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्यात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाहीत. तसेच पात्रता निकषात बदल झाल्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक संधी देऊ केली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी करावी.
– दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी कक्ष