मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राज्य कोट्यातील जागांसाठी पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दंत अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
नीट एमडीएस- २०२५ परीक्षेला बसलेल्या आणि महाराष्ट्रातील सरकारी, महामंडळ, राज्य आणि केंद्र सरकारच्या अनुदानित, विनाअनुदानित खासगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागांसाठी अर्ज करू इच्छिणार्यांना नोंदणी करता येणार आहे. नीट- एमडीएस- २०२५ साठी राज्य कोट्यांतर्गत असलेल्या जागांचा तपशील ३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर तात्पुरती गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम ४ ते ६ जुलैदरम्यान भरता येणार आहे. प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करणे ८ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ९ ते १३ जुलैदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
अर्ज करताना माहिती पुस्तिका वाचावी आणि अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता पडताळावी. अर्जात भरलेली कोणतीही चुकीची माहिती असल्यास प्रवेश रद्द होवू शकतो. पात्रतेची पडताळणी करण्यासाठी एनआरआय उमेदवाराने २ जुलैपूर्वी नोंदणी करावी, असेही सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी – ३ जुलैपर्यंत
शुल्क भरणे तसेच कागदपत्रे अपलोड करणे – ३ जुलैपर्यंत
राज्य कोट्यांतर्गत असलेल्या जागांचा तपशील – ३ जुलै
सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे – ४ जुलै
पसंतीक्रम भरणे – ४ ते ६ जुलै
प्रथम फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करणे – ८ जुलै
संस्थांमध्ये जाऊन प्रवेश घेणे – ९ ते १३ जुलै