इमारतीतील घरे भाडय़ाने देऊन बेकायदा झोपडय़ांची उभारणी

पूर्वमुक्त मार्गाच्या उभारणीदरम्यान बाधित झालेल्या चेंबूरमधील झोपडीधारकांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुनर्वसन केले आहे. मात्र, यातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी इमारतीमधील घरे भाडय़ाने देत पुन्हा झोपडय़ांची वाट धरली आहे. त्यामुळे रस्त्यासाठी राखीव असलेल्या जागेवर सध्या मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत.

नवी मुंबई आणि ठाण्यावरून येणाऱ्या वाहनांना दक्षिण मुंबईत तत्काळ पोहोचता यावे, यासाठी एमएमआरडीएने चार वर्षांपूर्वी पूर्वमुक्त मार्ग सुरू केला. या मार्गात अडथळा ठरणाऱ्या चेंबूरमधील पाच ते सहा हजार झोपडय़ा रिकाम्या करून तेथील कुटुंबांना मानखुर्द, गोवंडी, पांजरापोळ परिसरांत इमारती बांधून घरे देण्यात आली. मात्र, पुनर्वसनानंतर अल्पावधीतच ही कुटुंबे इमारतीतील घरे भाडय़ाने देऊन झोपडय़ांकडे वळली आहेत. चेंबूर वाशी नाका येथील नागाबाबा नगर येथे तर काही झोपडीधारकांनी रस्त्यासाठी राखीव असलेल्या जागेत पत्र्याची बांधकामे तयार
करून गोदामे, झोपडय़ा आणि दुकाने उभारली आहेत.  दिवसेंदिवस या ठिकाणी या झोपडय़ा वाढत असल्याने याबाबत परिसरातील जीवनअंश या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी अनेकदा पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे येथील अनधिकृत बांधकामांची माहिती दिली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्यापही कारवाई होत नसल्याने या ठिकाणी दिवसेंदिवस झोपडय़ांची संख्या वाढतच असल्याचे त्यांनी सांगितले. अशीच परिस्थिती चेंबूर पांजरापोळ येथेदेखील आहे. या ठिकाणीदेखील अनेकांनी पुन्हा रिकाम्या जागेवर झोपडय़ा उभारल्या आहेत.

मात्र या परिसरात अद्यापही काही झोपडीधारक पुनवर्सनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र नव्याने तयार होत असलेल्या या अनधिकृत झोपडीधारकांमुळे खऱ्या झोपडीधारकांकडे एमएमआरडीएकडून दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.