Dahisar Toll Naka relocation news दहिसर पथनाक्यामुळे दहिसरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वायू प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे दहिसर पथकर नाका इतरत्र हलविण्याची मागणी रहिवासी करत होते. ही मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती.

या बैठकीत शिंदे यांनी दहिसर पथकर नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ हलविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले आहेत. दिवाळीपर्यंत पथकर नाक्याचे स्थलांतर पूर्ण करण्याचेही आदेश शिंदेंनी दिले आहेत. त्यामुळे पथकर नाक्याचे स्थलांतर झाल्यास दिवाळीपासून दहिसरमधील वाहतूक कोंडी दूर होणार असून दहिसर ते मिरा-भाईंदर आणि मिरा-भाईंदर ते अंधेरी प्रवास सुसाट होणार आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या वेशीवर दहिसर पथकर नाका असून त्यामुळे पथकर नाक्याच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. दुसरीकडे पथकर नाक्यांवरील वाढत्या वाहनांमुळे परिसरात वायू प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे दहिसर, मिरा-भाईंदरमधील रहिवाशांनी पथकर नाका दोन किमीपर्यंत दूर हलविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पथकर नाक्यांच्या स्थलांतराबाबत चर्चा सुरु होती. मात्र निर्णय होत नव्हता.

आता मात्र शिंदे यांनी हा पथकर नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ हलविण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. शिंदे यांनी मंगळवारी यासंदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीत पथकर नाक्याच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. या बैठकीला एमएसआरडीसी, एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.

पथकर नाका स्थलांतरीत करण्यासंबंधीचा प्रस्ताव एमएसआरडीसीने तातडीने केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे पाठवावा. तर प्रस्तावाल मंजुरी घेत स्थलांतराच्या कामास सुरुवात करत दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करावे असेही आदेश शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. त्यामुळे स्थलांतराची प्रक्रिया दिवाळीपर्यंत पूर्ण होऊन नवीन जागेतील पथकर नाका कार्यान्वित झाल्यास दिवाळीपासून दहिसरमधील वाहतूक कोंडी दूर होऊन मिरा-भाईंदर ते दहिसर आणि मिरा-भाईंदर ते अंधेरी प्रवास वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मदत होणार आहे.