मुंबई : आईच्या दुधात केवळ पोषणच नाही तर बाळाला आयुष्यभराची रोगांविरुद्ध लढण्याची ढाल दडलेली असते, असे संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि लँसेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाच्या अहवालांनुसार स्तनपानामुळे नवजात बालकांची प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते तसेच संक्रमणजन्य आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. दुर्देवाने अलीकडच्या आधुनिक महिला स्तनपानाला विशेष महत्त्व देताना दिसत नाहीत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जन्मानंतर त्वरित स्तनपान सुरू करणे तसेच किमान सहा महिने केवळ आईचे दूध देणे अत्यावश्यक मानले जाते. यामुळे बाळाचे वजन योग्य दराने वाढते, मेंदूची वाढ अधिक चांगली होते आणि विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते. आयसीएमआरच्या अहवालानुसार, स्तनदूधात इम्युनोग्लोब्युलिन -ए, लॅक्टोफेरिन, ओलिगोसॅकेराइड्स अशा नैसर्गिक प्रतिजैविक घटकांचा समावेश असतो. हे घटक बाळाच्या पचनसंस्थेचे व श्वसनमार्गांचे रक्षण करतात, तसेच जीवाणू आणि विषाणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून थांबवतात.लँसेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जगभरात जर सर्व मातांनी शिफारशीनुसार स्तनपान केले तर दरवर्षी ८ लाखाहून अधिक पाच वर्षाखालील मुलांचे प्राण वाचू शकतात. अभ्यासात हेही नमूद करण्यात आले आहे की कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्तनपानामुळे बालमृत्यूचा धोका तब्बल ८८ टक्क्यांपर्यंत कमी होतो.
राष्ट्रीय परिवार आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-५) नुसार भारतात सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान करणाऱ्या मातांचे प्रमाण सध्या ४३ टक्के आहे. २०१५-१६ मधील सर्वेक्षणात हे प्रमाण केवळ ३१ टक्के होते. म्हणजे काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी अजूनही निम्म्यापेक्षा जास्त बालके या नैसर्गिक संरक्षणापासून वंचित आहेत. केंद्र सरकारचे आरोग्य विभाग तसेच विविध राज्यांमधील आरोग्य यंत्रणा स्तनपानाच्या जागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करत असते. मात्र त्याला म्हणावे तसे यश आल्याचे आजही दिसत नाही. तज्ञांच्या मते शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये स्तनपानाचा कालावधी कमी होत चालल्याने बालकांमध्ये सर्दी-खोकला, जुलाब व इतर संक्रमणांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच काही महिला स्वत:ची फिगर जपण्यासाठी स्तनपान करत नाहीत परिणामी बाळाच्या आरोग्याचे प्रश्न आगामी काळात निर्माण होताना दिसतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बाळाबरोबरच मातेसाठीही स्तनपान हे फायद्याचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.स्तनपान केल्याने मातेला पुढील गर्भधारणेमध्ये अंतर वाढते तसेच स्तन कर्करोगाचा धोका कमी होतो असे डागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचेही आढळले आहे. आईचे दूध हे फक्त आहार नाही तर ते बाळाचे पहिल औषध आहे. मातांनी स्तनपान लवकर सुरू करून किमान सहा महिने टिकवावे हेच सर्वात मोठं लसीकरण आहे, असे एम्स नवी दिल्ली येथील बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.आईचे दूध हे बाळासाठी केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर आरोग्याचे खरे कवच आहे. लँसेट, जागतिक आरोग्य संघटना तसेच आयसीएमआर या सर्व संस्थांऱ्या म्हणण्यानुसार स्तनपान जितके अधिक, तितकी प्रतिकारशक्ती मजबूत आणि मृत्यूदर कमी.
