रुग्णांना द्यायच्या ऑक्सिजनबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचा इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए) तीव्र निषेध व्यक्त करत डॉक्टरांवर असे असहिष्णू आरोप करणारे आणि उपचाराबाबत अशी अशास्त्रीय बंधने टाकणारे आदेश मागे घेण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासगी रुग्णालयाकडून ऑक्सिजनचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर होत असल्याने ऑक्सिजन वापराचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश शुक्रवारी आरोग्य विभागाने दिले आहेत. रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची  कमाल मर्यादा ठरवून देणे अवैज्ञानिक आहे. अशापद्धतीने वापरावर निर्बंध आणणे हे रुग्णांच्या आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मूलभूत अधिकार हिरावणारे आहे. या आदेशामुळे राज्याचा मृत्युदर आटोक्यात येण्याऐवजी वाढणार आहे, असे आयएमएने पत्रात नमूद केले आहे.

रुग्णहिताच्या दृष्टीने ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी आणि रुग्णालयांना आकारल्या जाणाऱ्या अवाजवी किंमतींना आळा घालण्यासाठी आयएमएने पाठपुरावा केला. मात्र शासनाने ऑक्सिजन पुरवठादारांच्या नफेखोरीला आळा घालण्याऐवजी या गैरप्रकाराचा सर्व दोष खासगी डॉक्टरांवर माथ्यावर लादलेला आहे. डॉक्टरांवर असे दोषारोप करत राहिल्यास आणि अशा एकतर्फी अवैज्ञानिक निर्णयानुसार आणि न परवडणाऱ्या बिलानुसार उपचार करण्याची बळजबरी करत असल्यास सर्व खाजगी रुग्णालये शासनाने स्वत:च चालवावीत असे आयएमएने यात स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions on the use of oxygen unscientific ima abn 97