गिरगावात चौपाटीच्या जवळ १९०८ साली उभी राहिलेली ‘ऑपेरा हाऊस’ ही ब्रिटिशकालीन वास्तू केवळ मुंबईच्याच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची एक साक्षीदार. ब्रिटिशांच्या मनोरंजनासाठी उभ्या राहिलेल्या या वास्तूने ऑपेरा, ब्रॉडवेचा मोकळा खडा सूर अनुभवला तसाच भारतीय बोलपटांचे सूरही आळवले. ऑपेराची कात टाकून चित्रपटगृह म्हणून हिंदी चित्रपटांची गोल्डन ज्युबिलीच्या पाटी अंगावर कौतुकाने वागवणारी ही वास्तू आज २३ वर्षांनी पुन्हा गजबजून उठते आहे. गेली आठ वर्षे ही वास्तू पुनरुज्जीवित करून पुन्हा मुंबईकरांना ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ भेट म्हणून देणाऱ्या शाही गोंदाल घराण्याच्या महाराणी कुमुद कुमारी यांच्याशी यानिमित्ताने केलेली बातचीत..

कुमुद कुमारी – ‘रॉयल ऑपेरा हाऊस’च्या मालक व शाही गोंदाल घराण्याच्या महाराणी

* गेले २३ वर्षे शांत असलेली ही वास्तू पुनरुज्जीवित करण्यामागचा हेतू काय?

‘रॉयल ऑपेरा हाऊस’ हे भारतातील एकमेव ऑपेरा हाऊस आहे. या वास्तूचा भव्यपणा, त्याचे सौंदर्य, विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच एकमेव सांस्कृतिक केंद्र म्हणून मिळवलेला लौकिक पाहता ही वास्तू पुन्हा त्याच पद्धतीने लोकांसमोर यावी, हा विचार कित्येक वर्षे मनात घोळत होता. गेल्या काही वर्षांत नाटकांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. थिएटर जे मधल्या काही वर्षांत चित्रपटांच्या प्रवाहात आपली शान हरवून बसले होते त्याला पुन्हा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे हे लक्षात आल्यानंतर नाटकांसाठीच म्हणून एकेकाळी उभे राहिलेले ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय दृढ झाला. मुंबई महापालिकेपासून ते वारसास्थळ समितीच्या अनेक परवानग्यांनंतर या वास्तूच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले आणि आज आठ वर्षांनी ते पुन्हा मुंबईकरांना सुपूर्द करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे.

* ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ बंद करण्यामागची नेमकी कारणे काय होती?

१९०८ साली ही वास्तू बांधली गेली. १९११ मध्ये ऑपेरा हाऊस हे सर्व लोकांसाठी म्हणून सुरू करण्यात आले त्या वेळी अर्थातच जहांगीर फ्रेमजी त्याचे काम पाहत होते. ऑपेरा हाऊस म्हणून त्याची सुरुवात झाली तेव्हा अनेक इंग्रजी ब्रॉडवेजचे शो तिथे होते. आपल्या कलाकारांनी बसवलेली इंग्रजी नाटके, अनेक गाण्यांचे कार्यक्रम, फॅ शन शो तिथे होऊ लागले. १९५२ मध्ये माझे सासरे गोंदालचे महाराज विक्रमसिंग यांनी ‘ऑपेरा हाऊस’ विकत घेतले होते. चित्रपटांना चांगले दिवस आले तसे नाटकांचा प्रभाव ओसरत गेला. म्हणून आम्ही हे थिएटर स्वरूपात न ठेवता त्याला चित्रपटगृहाचे स्वरूप दिले. त्या वेळी खास ऑपेरासाठी म्हणून कोच असलेले रॉयल बॉक्सेसची रचना होती ती काढून टाकण्यात आली. त्या वेळी ‘ऑपेरा हाऊस’ चित्रपटगृहात रूपांतरित करण्याची आमची कल्पना खूप यशस्वी ठरली. अनेक हिंदूी चित्रपटांनी तिथे ‘गोल्डन ज्युबिली’ साजरी केली. त्यामुळे कित्येकांसाठी ते ‘लकी थिएटर’ म्हणून ओळखले जात होते. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘गंगा जमुना’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘रोटी, कपडा और मकान’ असे किती तरी चित्रपट तिथे यशस्वी ठरले होते. मात्र वातानुकूलित चित्रपटगृहे आली तसे ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मध्ये मोठमोठय़ा टेबल फॅ न्सच्या आधारे चित्रपट बघणे सगळ्यांनाच अवघड जाऊ लागले. हळूहळू एकपडदा चित्रपटगृह चालवणेच कठीण झाल्याने आम्ही ही वास्तू बंद करण्याचा निर्णय घेतला. आज पुन्हा एकदा १८व्या ‘जिओ मामि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या निमित्ताने ऑपेरा हाऊसचा शुभारंभ होतो आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

* वास्तू पुनरुज्जीवित करताना काय अडचणी आल्या?

मुळात, भारतात ब्रॉडवे सादर करण्यासाठी ज्या पद्धतीची वास्तू हवी तशी कुठेही उपलब्ध नाही. ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ हे केवळ ऑपेरासाठी बनवण्यात आले होते. त्यामुळे ऑपेरा पाहण्यासाठी ज्या पद्धतीची आसनव्यवस्था हवी ती तिथे होती. शिवाय ते बॉरोक शैलीत बनवलेलं होतं. भारतात अन्यत्र कुठेही बॉरोक शैलीतील थिएटर बांधण्यात आलेले नाही. न्यूयॉर्क, लंडन आणि ऑस्ट्रिया इथे तशी थिएटर्स बांधण्यात आलेली होती. ब्रॉडवे शोमध्ये कलाकारांचे आवाज खणखणीत ऐकू येणे महत्त्वाचे असते. त्यासाठी छताशी समांतर असे ध्वनिसंयोजन हेही ऑपेरा हाऊसचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे त्याच पद्धतीचे, दर्जाचे ध्वनिसंयोजन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारणे हे एक आव्हानच होते.

* ‘ऑपेरा हाऊस’मधील ‘ब्रॉडवे शों’ च्या आठवणी..

‘ऑपेरा हाऊस’बद्दलच्या माझ्या आठवणी या साधारण ५२-५३ सालच्या आहेत. त्या वेळी मी खूप तरुण होते. तेव्हा पृथ्वीराज कपूर यांची नाटके ऑपेरा हाऊसमध्ये चालायची. त्या वेळी इंग्रजी नाटकेही खूप झाली पण ती काही फारशी पाहण्यात आली नाही. आपल्याकडच्या कलाकारांनी सादर केलेली हिंदी-इंग्रजी नाटके ही त्या वेळी ऑपेरा हाऊसची शान होती. ५४-५५ साली असेल.  जेनिफर म्हणजे शशी कपूर यांची पत्नी, तिच्या वडिलांनी जेफ्री केंडाल यांनी ‘शेक्सपिअर’ बसवले होते.

* ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ पुन्हा एकदा सांस्कृतिक केंद्र ठरावे यासाठी काही विशेष योजना?

‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने या वास्तूचा शुभारंभ होतो आहे हे एक समाधान आहे. ज्या वेळी ही वास्तू पुन्हा सुरू होते आहे हे सर्वदूर झाले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी विचारणा होते आहे आणि एक प्रकारे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नाटक-फॅशन शोजपासून सगळ्यांसाठी विचारणा सुरू झाली आहे. सध्या शबाना आझमींचे नवे नाटक इथे सुरू होणार आहे. त्यानंतर संजना कपूर यांचे ‘जुनून’ हे नाटक ऑपेरा हाऊसमध्येच दाखवले जाणार आहे. शबाना आझमींचाच एक वेगळा शोही असेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच इथे कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय, फॅ शन शो, पाश्चिमात्य ब्रॉडवेजच्या सादरीकरणासाठी आम्ही आग्रही आहोत.