मुंबई : आपल्या देशात श्रमप्रतिष्ठा लयाला गेल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. येथील रवींद्र नाटय़ मंदिरात रोहिदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कामाच्या स्वरुपाचा विचार न करता त्याचा आदर करण्याचे आवाहन भागवत यांनी केले.
संत रोहिदास महाराज यांच्यावर बोलायला मिळणे हे आपले भाग्य असल्याचे भागवत म्हणाले. धर्माने वागून आपण जगाचे कल्याण करू शकतो, हा विश्वास ६०० वर्षांपूर्वी संत रोहिदास यांनी त्याच्या ‘रोड मॅप’सकट समाजात जागवला असे ते म्हणाले. ‘सर्वाभूती एकच’ हे तत्व आपण आधी विसरलो त्यामुळे स्वार्थ मोठा झाला आणि त्याचा फायदा परकीय आक्रमकांनी घेतला. वैयक्तिक स्वार्थामुळे चुकीच्या रूढी परंपरा अस्तित्वात आल्या. सत्य हाच धर्म हे तत्त्वज्ञान आपण विसरलो. त्यामुळे समाजात उच्चनीचता अस्तित्वात आली, श्रमप्रतिष्ठा लयाला गेली. त्याचे दुष्परिणाम आज आपण बघतो आहोत, असे सरसंघचालक यावेळी म्हणाले. ‘मन चंगा तो कठौती मे गंगा हे अनुभूतीने सिद्ध करून दाखवले. संत मीराबाई, राजा पिपा, चित्तोडची महाराणी यांना शिष्यत्व देऊन संत पदाला पोहोचवणारे संत रोहिदास हे खऱ्या अर्थाने संत शिरोमणी होते, अशा शब्दांत भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले की, संत रोहिदासांनी आपल्या १५१ वर्षांच्या दीर्घायुष्यात, जन्माने श्रेष्ठत्व मिळत नाही तर ते आचरणाने मिळते; तोच खरा शाश्वत धर्म हे तत्त्वज्ञान आपल्या नि:स्पृह आचरणाने समाजाला दाखवून परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त केला. त्याच मार्गाने जाऊन भारताला विश्वगुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.
पंडितांनी समाजात उच्चनीचता निर्माण केली
पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली. भगवद्गीता व अन्य धर्मग्रथांनी समाजाला सत्य सांगितले. पण आपण भेदाभेद निर्माण करून सत्याचे अनुसंधान केले नाही. समाज विखुरला गेल्याने परकीय आक्रमकांनी त्याचा लाभ घेतला, असे मत प्रदर्शन भागवत यांनी केले.