केंद्र आणि राज्याच्या सत्तेत राहूनही सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेण्याचा सपाटा लावणाऱ्या शिवसेनेने आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी करण्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या निवडीसंदर्भात भाष्य केले आहे. एखादा हिंदू साधू मुख्यमंत्रीपदी बसणं वाईट नाही. पण उत्तर प्रदेशसारखं बलाढ्य राज्य चालवणं हे मठ किंवा पीठ चालवण्याइतके सोपे नाही, असा खोचक टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. यासाठी योगी आदित्यनाथ यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या साध्वी उमा भारती यांचे काय झाले, याचा इतिहास समजून घ्यावा , असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे. तसेच यानिमित्ताने भाजपच्या महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद निर्माण न करण्याच्या निर्णयावरही शिवसेनेने अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. भाजपने उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्राचा प्रश्न आला तेव्हा कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद निर्माण होणार नसल्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगण्यात आले. पण जम्मू-कश्मीरात भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून थेट मेहबुबा मुफ्तीशीच मांडवली केली व उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्र्यांना नेमून आदित्यनाथ महाराजांना धर्मकारणासाठी मोकळे ठेवले आहे,  असे या अग्रलेखात म्हटले आहे.

याशिवाय, शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांच्या भूमिपुत्रांना रोजगारासाठी प्राधान्य देण्याच्या भूमिकेचीही कौतूक केले आहे.  योगी आदित्यनाथ यांचा हा निर्णय हा शिवसेनेच्याच विचारांचा विजय आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प व उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्याची भाषा करतात तेव्हा शिवसेनेचा ५० वर्षांचा कालखंड सफल झाला असेच म्हणावे लागेल. उत्तर प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तर मुंबईसारख्या शहरावरील भार हलका होईल. मुंबईतील उत्तर भारतीयांनी मोठय़ा संख्येने भाजपास मतदान केले ते त्यांना त्यांच्या गावी जाऊन सुखाने व स्वाभिमानाने जगता यावे म्हणून. योगी आदित्यनाथ महाराजांनी देशभरातील उत्तर भारतीयांच्या मनातीलच भावना बोलून दाखवली हे आता बरे झाले, असे सांगत स्वत:च्या प्रादेशिकतेच्या राजकारणाचे एकप्रकारे समर्थन केले आहे.