ज्या संवादिनीमुळे सुरुवातीला अवहेलना झाली त्याच संवादिनीने पुढील आयुष्यात पं. तुळशीदास बोरकर यांना मानसन्मान, यश, प्रसिद्धी, आर्थिक स्थैर्य आदी सर्व काही दिले. अनेक दिग्गज गायक, गुणीजनांचा सहवास त्यांना लाभला. ‘पद्मश्री’सह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली. संवादिनी वादन कलेवर राजमान्यतेची मोहर उमटली. आयुष्याच्या या वळणावर मी समाधानी असून संवादिनी माझे सर्वस्व, माझा श्वास आहे…. पं. बोरकर सांगत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बरोबर एक वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी आमची भेट झाली होती. आज पं. बोरकर गेल्याची बातमी आली आणि वर्षभरापूर्वी त्यांच्यासमवेत झालेल्या गप्पांच्या आठवणीनी मनात दाटी केली. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांची स्मृती आणि बोलणे व्यवस्थित होते. सदरा-लेंगा आणि डोक्यावर काळी टोपी अशा वेषातील त्यांची मूर्ती आजही डोळ्यासमोर लख्ख उभी आहे.

‘संवादिनी’वादन करतो? हे कसले भिकेचे डोहाळे? अशा शब्दांत परिचित आणि आप्तांकडून सुरुवातीला त्यांची अवहेलना झाली. काही वर्षे बिकट आर्थिक परिस्थितीतही राहावे लागले. मात्र तरीही त्यांनी ‘संवादिनी’प्रति असलेली आपली निष्ठा सोडली नाही. सर्वस्व संवादिनीला वाहिले. जिद्द, परिश्रम, आई-वडिलांचा आशीर्वाद आणि नवदुर्गादेवीची कृपा यामुळेच संवादिनी वादनाच्या क्षेत्रात मी थोडेफार काही केले असल्याचे त्यांनी नम्रतापूर्वक सांगितले होते.

संवादिनीवादनातील अग्रणी पी. मधुकर यांचे संवादिनीवादन पं. बोरकर यांनी लहानपणी ऐकले होते. त्यांच्याकडे शिकायला मिळावे अशी इच्छा त्यांच्या मनात होती आणि ती १९५७ मध्ये पूर्ण झाली. त्या विषयीच्या आठवणीला उजाळा देताना पं. बोरकर म्हणाले होते, मुंबईत ‘कला मंदिर’नाटय़संस्थेचे गोपीनाथ सावकार यांच्याशी परिचय झाला. तेव्हा दर रविवारी गिरगावातील साहित्य संघात संगीत नाटके होत असत. ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग होता. छोटा गंधर्व ‘कृष्ण’ आणि हिराबाई बडोदेकर व माझी बहीण या दोघी अनुक्रमे ‘सुभद्रा’ आणि ‘रुक्मिणी’ या भूमिका करत होत्या. मी त्या नाटकात ऑर्गनची साथ करत होतो. तिसरा अंक पार पडला आणि प्रेक्षकांमधून एक जण रंगमंचावर आले. ती व्यक्ती बाबुराव कुमठेकर यांच्या ओळखीची होती. त्यांचे नाव कृष्णराव कुमठेकर होते. ऑर्गनची साथ करणारा हा मुलगा कोण? याचा हात खूप चांगला आहे असे सांगून त्यांनी, ‘मधु’कडे शिकायचे आहे का, असा प्रश्न केला. हे मधू म्हणजे प्रतिभावंत संवादिनीवादक पी. मधुकर. (मधुकर पेडणेकर) त्यांच्याकडे शिकायची इच्छा माझ्या मनात होतीच. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पुढच्या एका रविवारी मला कुमठेकर पी. मधुकर यांच्या गिरगावातील घरी घेऊन गेले. त्यांनी संवादिनीवादनाच्या ‘गमभन’पासून शिकवायला सुरुवात केली. ते काहीही बोलायचे नाहीत. सुमारे सहा महिने त्यांचा काही संवाद नव्हता. किमान काही शब्द तरी त्यांनी बोलावे, असे मला वाटत होते. जवळपास सहा महिन्यांनतर एके दिवशी शिकवणी झाल्यावर मी जायला निघालो. तेव्हा ते बायकोला म्हणाले, अगं आज तुळशीदासही माझ्याबरोबर जेवणार आहे. त्याचेही पान घे. गुरूंनी माझी एक प्रकारे परीक्षाच घेतली होती. त्यांच्याकडे दहा वर्षे मी संवादिनी शिकलो. त्यांनी खूप भरभरून दिले.

ऑर्गन व संवादिनी यातील नेमका फरकही त्यांनी समजावून सांगितला हो पं. बोरकर म्हणाले होते, संवादिनीत हातपेटी व पायपेटी असे दोन प्रकार आहेत. संवादिनीतील सूर अगदी सहज येतो. ऑर्गनच्या पट्टय़ा/की बोर्ड हा संवादिनीपेक्षा लांब असतो. मोठी माणसे चालताना उगाचच धावत-पळत नाही, पण लहान मूल मात्र धावत-पळत सुटते. नेमका हाच फरक ऑर्गन व संवादिनीत आहे. संवादिनी ही वेगात पळणारी तर ऑर्गन शांत, संथ आहे. आवाजातील/सुरांमधील मोहकता, गांभीर्य हे ऑर्गनमध्ये अधिक आहे. ही दोन्ही वाद्ये वाजविणे म्हटले तर सोपे आणि म्हटले तर अवघड आहे. दोन्हींचे तंत्र समजले व समजून घेतले पाहिजे. दोन्ही वाद्ये वाजविण्यासाठीचे ‘कौशल्य’ ही तुमच्यात असणे गरजेचे आहे. बालगंधर्व यांचा आवाज, त्यांची पट्टी ऑर्गनशी तर दीनानाथ मंगेशकर यांचा गळा पायपेटीशी अधिक मिळताजुळता होता. पूर्वी संगीत नाटकातून ऑर्गनची साथ असायची. आता संगीत नाटकांची संख्याही कमी झाल्याने ऑर्गन वादन कमी झाले आहे.
संवादिनी वादनातील या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

(पं. बोरकर यांच्याशी झालेल्या गप्पांचा सविस्तर वृत्तान्त लोकसत्ता-रविवार वृत्तान्तमधील ‘पुनर्भेट’ सदरात गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला होता. तो खालील लिंक वर वाचता येईल.)
संवादिनीचा सांगाती https://loksatta.com/manoranjan-news/veteran-harmonium-artist-and-padshree-pandit-tulsidas-borkar-chat-with-loksatta-shekhar-joshi-1525212//lite/

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanvadini my breath said pt tulsidas borkar