मुंबई : विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक गुरूवारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून, ८ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होणार आहे. विधि अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दिलेल्या ७४ हजार ६२१ विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार ८९२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली

विधि अभ्यासक्रमाचा निकाल २० जून रोजी जाहीर झाल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ३० जून ते २१ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करण्याबरोबरच १ ते २५ जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार ५७ हजार ८९२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यातील ५१ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज अंतिम केले. तर ४१ हजार १२० विद्यार्थ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी करून अर्ज निश्चित केले.

अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची आद्याक्षरानुसार यादी २८ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. आता २ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर ३ ते ५ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येईल. या मुदतीनंतर ८ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थांना ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत.

पहिल्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून १९ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीसाठीची निवड यादी जाहीर करण्यात येईल. त्यात प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २० ते २२ ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसऱ्या यादीसाठीच्या रिक्त जागांचा तपशील २३ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीसाठी विद्यार्थ्यांना आपल्या अर्जात बदल करण्यासाठी २४ ते २७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या फेरीसाठी आद्याक्षरानुसारची यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. तिसरी अंतिम यादी ७ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येईल. संस्थात्मक फेरीसाठीची प्रवेश प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.