मुंबई : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत आहे. यंदा जानेवारी ते मे महिन्यात तब्बल पन्नासहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. एकाच दिवशी तीन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे एकमेकांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक मराठी चित्रपटांना अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही. त्यामुळे मराठी चित्रपटांची आपापसातली स्पर्धा टाळण्यासाठी ‘शातिर : द बिगिनिंग’ हा मराठी चित्रपट २३ मे ऐवजी १३ जूनला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभरहून अधिक चित्रपटांची निर्मिती होते. या अनुषंगाने प्रत्येक आठवड्याला किमान दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार हे निश्चित आहे. परंतु मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यावर कोणत्याही शासकीय संस्थेचे नियंत्रण नसल्याने अनेकदा तीन ते चार मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे कोणत्याच चित्रपटाला ‘प्राइम टाइम’ मिळत नाही. आता परवा, २३ मे रोजीही अनेक मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. हेच जाणून मराठी चित्रपटांची अनियंत्रित स्पर्धा टाळण्यासाठी ‘शातिर : द बिगिनिंग’ हा मराठी चित्रपट २३ मे ऐवजी १३ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याची भूमिका निर्मात्यांनी घेतली आहे.
दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्या अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, ‘चित्रपटाची गाणी व ट्रेलर याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनासाठीची आमची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु एकाच वेळी जवळपास सात मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांची एकमेकांमध्ये होणारी स्पर्धा टाळण्यासाठी आम्ही आमच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट महामंडळाने एखादी समिती तयार करून एका वेळी दोन किंवा तीन पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण एका वेळी ५ ते ७ मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यास कुणालाही प्रेक्षक मिळणार नाहीत आणि निर्माते म्हणजेच पर्यायाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला त्याची झळ बसणार आहे.’
सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा आणि सत्य कथेवर आधारित ‘शातिर : द बिगिनिंग’ या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे सुनील वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत आहे, तर वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे.