डॉ. आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक येत्या दोन वर्षांमध्ये उभं राहणं शक्य आहे असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. गर्दीच्या काळातही स्मारकाची काळजी घ्यावी लागेल. या स्मारकाला आणखी विलंब होऊ नये अशी याची काळजी घ्यावी लागेल असाही सल्ला शरद पवार यांनी दिला. न्यूयॉर्कमधे गेल्यावर जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी लोक जातात अगदी तसेच इंदू मिलमधे डॉ. आंबेडकर यांचं स्मारक पाहण्यासाठी लोक आले पाहिजेत असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदू मिल येथील जागेची पाहाणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली मतं मांडली. स्मारकाचं २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. ७५ टक्के काम बाकी आहे. ज्या कंपनीकडे हे काम देण्यात आलं आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. त्यांनी मनापासून ठरवलं आणि कोणत्याही संमतीचा विषय उरला नाही तर दोन वर्षात हे स्मारक उभं राहणं शक्य आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. हे स्मारक असं झालं पाहिजे की याचं आकर्षण जगभरातल्या पर्यटकांना वाटावं. चैत्यभूमी आणि स्मारक पाहिल्याशिवाय कुणीही परत जाणार नाही असं स्मारक व्हायला हवं असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

आधीच्या सरकारने या स्मारकाचं काम रखडवलं का? असं विचारलं असता आपण कुणावर टीका टीपण्णी कशाला करायची? या स्मारकासाठी ज्याचा ज्याचा हातभार लागला असेल त्यांचे आभार. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक देशाबाहेरदेखील आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.

“मी काही सूचना केल्या नाहीत. पण मला ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल या दोन तारखा समोर दिसतात. लाखो लोक इथे येतात. सगळा घटक बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भारावून जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar visits indu mill for ambedkar statue status scj