सीबीआयची न्यायालयात माहिती; पीटर आणखी तीन दिवस कोठडीत
शीना बोरा हिची हत्या ही आर्थिक व्यवहारांतून उद्भवलेल्या वादातूनच करण्यात आली, असा दावा सीबीआयतर्फे सोमवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर करण्यात आला. एवढेच नव्हे, तर शीनाची आई आणि प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने शीनाचा ई-मेल आयडी उघडला त्या वेळेस पीटर तेथे उपस्थित होता, असा दावाही सीबीआयतर्फे न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने पीटरच्या सीबीआय कोठडीत २६ नोव्हेंबपर्यंत वाढ केली.
पीटरच्या सीबीआय कोठडीची मुदत संपल्याने त्याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी महेश नातू यांच्यासमोर सोमवारी दुपारी तीननंतर हजर करण्यात आले. त्या वेळी सीबीआयने शीनाची हत्या आर्थिक व्यवहारांतून करण्यात आल्याचा दावा केला. त्या दृष्टीने तपास करायचा असल्याने पीटरला १० दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी सीबीआयतर्फे करण्यात आली. मात्र सीबीआयकडून करण्यात आलेला युक्तिवाद काही नवा नाही. असे असले तरी तपास करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने पीटरला केवळ २६ नोव्हेंबपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.
इंद्राणी आणि पीटरने कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केल्याची बाब पीटरच्या चौकशीतून पुढे आलेली आहे. मात्र एवढा पैसा त्यांच्याकडून आला कुठून आणि त्यांनी मिळवला कसा याचा खुलासा पीटरने केलेला नाही; परंतु चौकशीमध्ये या संदर्भात काही महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे. या सगळ्याची पीटरला माहिती आहे, असेही सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

शीना हरविल्याचा बनावही!
मुंबई : शीना बोरा हिची हत्या झाल्यानंतर पीटर व इंद्राणी मुखर्जी यांनी मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाशी संबंधित एका बडय़ा अधिकाऱ्याची भेट घेऊन ती सापडत नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे तिच्या मोबाइल फोनच्या ठावठिकाण्याचा शोध घेण्याची विनंती केली होती; परंतु काही काळानंतर ती सापडल्याचेही संबंधित तपास अधिकाऱ्याला सांगितल्याने परस्पर चौकशी बंद केली. परंतु शीना हत्येची कुणकुण लागू नये, यासाठी या दाम्पत्याने बनाव रचला असावा, असा सीबीआयचा दावा आहे. पीटरच्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी संबंधित गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्याकडेही सीबीआयने विचारणा केल्याचे कळते. हे दाम्पत्य दूरध्वनीवरून बोलले आणि त्यांनी शीनाच्या मोबाइल फोनच्या ठावठिकाण्याविषयी माहिती शोधण्याची विनंती केली, असे या अधिकाऱ्याने मान्य केले आहे. हरवलेल्या व्यक्तीच्या विभागाकडे ही तक्रार हस्तांतरित केली होती. मात्र शीना सापडल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने चौकशी बंद केली, असेही आता स्पष्ट झाले आहे. परंतु शीना सापडली वा नाही, याची शहानिशा केली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पीटरची चौकशी दिल्लीत?
अटकेतील पीटर मुखर्जी याला चौकशीसाठी दिल्ली येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा पहिला पती संजीव खन्ना तसेच चालक शामवर राय यांच्याविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर पीटरला अटक करण्यात आली होती. पीटरला सीबीआयच्या ‘टास्क फोर्स’च्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात ठेवण्यात आले होते.