संजय बापट
राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे. गेली पाच वर्षे राज्याची सत्ता उपभोगणाऱ्या या दोन्ही पक्षांची राज्यातील निम्म्या जिल्ह्य़ात विधानसभेची पाटी कोरी असल्याचे समोर आले आहे. भाजपला तीन, तर सेनेला १३ जिल्ह्य़ांतील एकाही विधानसभा मतदारसंघात खाते उघडता आलेले नाही.
भाजपला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्य़ातूनच हद्दपार व्हावे लागले आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या असून कोल्हापूरप्रमाणेच पालघर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्य़ांतही भाजपला एकही आमदार निवडून आणता आलेला नाही.
मुंबई महानगर प्रदेशात दबदबा निर्माण करीत राज्यभरात ५६ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेलाही जालना, बीड, लातूर, नागपूर, नंदूरबार, सोलापूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती आणि पुणे जिल्ह्य़ात आपले खाते उघडता आलेले नाही. दोन खासदार आणि सहा आमदार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्य़ातही कशीबशी एक जागा टिकवून ठेवण्यात सेनेला यश आले आहे.
दोन्ही काँग्रेसचीही तीच स्थिती
५४ जागा जिंकत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, नंदूरबार, सिंधुदुर्ग, वर्धा,चंद्रपूर, अकोला, अमरावती, मुंबई शहर या जिल्ह्य़ात एकही जागा जिंकता आलेली नाही.
तर ४४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, गडचिरोली, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्य़ांत खाते उघडता आलेले नाही.
