मुंबईचे विधानसभा सदस्य (आमदार) प्रकाश सुर्वे यांनी नुकतीच दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप प्रकाश सुर्वे यांनी केला. या व्हिडीओमध्ये एक महिला अश्लील कृत्य करताना दिसत होती आणि नंतर त्याच नंबरवरून एका व्यक्तीने त्यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाठवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
मागाठाणे विधानसभेतील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. मी अनेकांचे फोन उचलतो आणि आणि मदतीसाठी विचारणा करणाऱ्या अनेक व्हॉट्सअॅप मेसेजला उत्तर देत असतो अशी माहिती सुर्वे यांनी पोलिसांना दिली.
प्रकाश सुर्वे यांना ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२० च्या सुमारास एका अनोळखी नंबरवरून एक व्हॉट्सअॅप मेसेज आला, ज्यामध्ये हॅलो, कसे आहात, असे एकाने व्यक्तीने म्हटले होते. पुन्हा १३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना हाय असा आणखी एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. हे मेसेज अनोळखी नंबरवरून आल्याने सुर्वे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
१६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१० च्या सुमारास, प्रकाश सुर्वे यांना त्याच नंबरवरून आणखी एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्यावेळी आरोपीने “हॅलो, क्या हुआ जी” असे म्हटले. त्यानंतर लगेचच प्रकाश सुर्वे यांना व्हिडिओ कॉल आला.
“सुरुवातीला मी फोन घेतला नाही, पण दुसरा कॉल आल्यावर मी तो घेतला,” असे सुर्वे यांनी पोलिसांना सांगितले. व्हिडिओ कॉलवर एक महिला अश्लील कृत्य करत होती. “काय घडत आहे हे लक्षात येताच मी लगेच कॉल कट केला. मला त्या नंबरवरून वारंवार फोन आले आणि मी त्या व्यक्तीला उत्तर दिले की मला फोन करू नका अन्यथा मी पोलिसात तक्रार करेन,” असे सुर्वे यांनी पोलिसांना सांगितले.
त्यानंतर आरोपींनी सुर्वे यांचा फोटो दुसऱ्या व्यक्तीसोबत मॉर्फ करून त्यांना पाठवून ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करु, असे आरोपींनी धमकी दिल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे लक्षात येताच, प्रकाश सुर्वे यांनी चार डिसेंबर रोजी दहिसर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर भारतीय दंड संहिता कलम ५०० (बदनामी), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ६६ ई (गोपनीयतेचे उल्लंघन) आणि ६७ अ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी शिवसेनेचे कुर्ला-नेहरुनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना हनीट्रॅप करुन पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली होती. मोसमदिन दिन महोम्मद खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव होते.