राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी जाहीरपणे घेतलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपला शनिवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले. श्रीहरी अणे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री व भाजपचे इतर मंत्री ठामपणे उभे राहिले आहेत, याचे आश्चर्य वगैरे वाटण्याचे कारण नाही. हा रक्तदोष आहे, अशा शेलक्या शब्दांत सेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातील अग्रलेखात अणे यांच्या भूमिकेस पाठिंबा देण्याचा नादानपणा जे लोक करीत आहेत त्यांना १०५ हुतात्म्यांचे तळतळाट लागून संपूर्ण सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील म्हटले आहे.
अॅडव्होकेट जनरल पदावरील व्यक्तीने महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेतली व हा घोर अपराध करूनही हे महाशय ‘भाजप’कृपेने पदास चिकटून आहेत. शिवसेनेचे आमदार ‘अखंड महाराष्ट्रा’चा गजर नागपूरच्या विधानसभेत व बाहेर करीत आहेत. हा जणू अपराधच ठरत आहे. महाराष्ट्राच्या अॅडव्होकेट जनरलने स्वतंत्र विदर्भाचा उघड पुरस्कार केला हे त्यांचे वैयक्तिक मत कसे काय ठरू शकते? फडणवीस मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याने ‘शेण’ खाल्ले तर तो संपूर्ण राज्याचा व सरकारचा विषय ठरेल. मंत्र्याने शेण खाल्ले हा त्याचा वैयक्तिक विषय आहे, असे मुख्यमंत्र्यांना म्हणता येईल काय?, असा सवालदेखील शिवसेनेने या अग्रलेखाच्या माध्यमातून विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी खडाजंगी सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2015 रोजी प्रकाशित
हा तर रक्तदोष! स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवरून सेनेची भाजपवर टीका
गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी खडाजंगी सुरू आहे.
Written by रोहित धामणस्कर

First published on: 19-12-2015 at 09:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena take a dig on bjp over separate vidarbha issue