९५ वर्षे जुन्या चाळी मोडकळीस; ९६० कुटुंबांचा संसार भीतीच्या छायेखाली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरळी, नायगाव आणि  ना. म. जोशी मार्ग मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी शिवडीच्या चाळींचा तिढा अद्याप कायम आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर वसलेल्या चाळी ९५ वर्षे जुन्या असून आता त्याही मोडकळीला आल्या आहेत. रहिवाशी या चाळींमध्ये जीव मुठीत धरून राहत असून इतर बीडीडी चाळींप्रमाणे पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात ‘बॉम्बे डेव्हलपमेंट डिव्हिजन’तर्फे मुंबईमध्ये वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग, शिवडी या ठिकाणी चाळी बांधण्यात आल्या. साधारण ९५ वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या चाळी आता पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. यातील वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील चाळी महाराष्ट्र शासनाअंतर्गत आहेत. शिवडीतील १२ चाळी मात्र मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत येतात. या जमिनीवर राज्य सरकारची मालकी नसल्याने सरकार या चाळी म्हाडाकडे विकासाकरिता हस्तांतरीत करु शकत नाहीत. मात्र चाळींची अवस्था अत्यंत बिकट असल्याने येथे पुनर्विकासाची नितांत आवश्यकता असल्याचे रहिवाशी सांगत आहेत.या चाळीमधील दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. परंतू आर्थिक निधीची कमतरता असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत असल्याने अगदी लहानसहान दुरूस्तीची कामेही कित्येक दिवस प्रलंबित राहतात. चाळींच्या स्वच्छता, दुरूस्तीची कामे, सुरक्षा आधी सर्व जबाबदारी चाळीतील पार पडावी लागते. चाळीच्या बाजूलाच कचराकुंडी आहे. त्यामुळे तेथे डासांचे प्रमाण वाढले आहे. १२ चाळीत एकूण ९६० बिऱ्हाडे वास्तव्यास आहेत. चाळींतील घरांच्या छपरांची दुर्दशा झाली आहे. घरांच्या भिंती भुसभुशीत झाल्या आहेत, पोपडे निघाले आहेत. त्यामुळे ते कधीही डोक्यावर पडेल, अशी भिती सतत चाळकऱ्यांना वाटत असते. याशिवाय, पाणी गळतीचे प्रमाण देखील भरपूर आहे. शिवाय चाळीमध्ये सार्वजनिक शौचालय असल्याने वयोवृद्धांचे हाल होत आहेत.

आमच्या इमारती इतक्या जर्जर झाल्या आहेत की छप्पर कधी डोक्यावर पडेल हे सांगता येत नाही. याशिवाय इथे स्वच्छता व शौचालयांची दुरवस्था झाली आहे.

दत्ताराम वैती, रहिवाशी, शिवडी बीडीडी चाळ

मी घरी शिकवणी घेते. माझ्या घरात लहान मुले असतात. छप्पर इतके कमकुवत झाले आहे की ते कधी डोक्यावर पडेल हे सांगता येत नाही. इथे दुरूस्ती केली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. भिंती भुसभुशीत असल्याने प्लास्टर टिकत नाही. गेली २० वर्षे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर लवकर निर्णय व्हावा.

सुनिता तांबे, रहिवाशी शिवडी बीडीडी चाळ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivadi bdd building redevelopment