गोरेगाव येथील सिद्धार्थनगरमधील पत्रावाला चाळीचा पुनर्विकास प्रकल्प गेल्या सहा वर्षांपासून रखडला आहे. शिवाय त्या प्रकल्पाच्या कंत्राटदाराने इतर कंपन्यांना उपकंत्राटे दिल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प ‘म्हाडा’नेच ताब्यात घेऊन राबवावा, त्यातून एक हजार कोटी रुपयांचा लाभ होऊ शकेल, अशी मागणी ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांनी केली आहे.
गोरेगाव पश्चिम येथील ४० एकर जमिनीवर ‘म्हाडा’ने २००७ मध्ये पुनर्विकास प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली. ‘गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ला हे काम मिळाले. नंतर यात ‘एचडीआयएल’चा सहभाग असल्याचे समोर आले. पुनर्विकासानंतर २५ टक्के घरे ‘म्हाडा’ला तर ७५ टक्के घरे बिल्डरला असा करार झाला. मात्र, सहा वर्षे उलटूनही हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. तशात आता कंत्राटदार कंपनीने चार भूखंड इतर विकासकांना देऊन कामाची सुरुवात केली आहे. परस्पर अशा रीतीने इतर कंपन्यांना उपकंत्राटे देणे नियमबाह्य़ आहे.
या जागेवर ६७५ बैठी घरे असून त्यातील ३६८ घरे संक्रमण शिबिरांतील आहेत. पण या ६७५ पैकी एकालाही अद्याप घर मिळालेले नाही. पुनर्विकासातील गैरकारभाराबाबत माजी आमदार नंदकुमार काळे यांनीही तक्रारी केल्या आहेत. एकंदरच सिद्धार्थनगरचा पुनर्विकास प्रकल्प अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प ‘म्हाडा’नेच ताब्यात घ्यावा आणि राबवावा. तसे झाल्यास या जागेवर तीन एफएसआय मिळेल. त्यातून ‘म्हाडा’ला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा लाभ होऊ शकेल, असे लाड यांनी सांगितले. याबाबत आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिले असून त्यांनी यात लक्ष घालून सिद्धार्थनगरचे रहिवासी, ‘म्हाडा’ला न्याय द्यावा. या प्रकल्पातून खासगी बिल्डरपेक्षा ‘म्हाडा’ला परवडणाऱ्या घरांची निर्मिती करता येईल, असेही लाड यांनी नमूद केले.
मात्र, ‘गुरू आशीष कन्स्ट्रक्शन’ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रकल्पाचे काम नियमानुसारच सुरू आहे. आमच्यावरील आरोप हे चुकीचे व निराधार आहेत, असे त्यांनी खुलाशात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2013 रोजी प्रकाशित
सिद्धार्थनगर पुनर्विकास म्हाडाच्या ताब्यात?
गोरेगाव येथील सिद्धार्थनगरमधील पत्रावाला चाळीचा पुनर्विकास प्रकल्प गेल्या सहा वर्षांपासून रखडला आहे. शिवाय त्या प्रकल्पाच्या कंत्राटदाराने इतर कंपन्यांना उपकंत्राटे दिल्याच्या तक्रारी येत आहेत.

First published on: 10-10-2013 at 12:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth nagar redevelopment project under mhada possession