Karnak Bridge Inauguration: मुंबईतील बहुप्रतिक्षित नवीन कर्नाक ब्रिज अर्थात ‘सिंदूर पुला’चं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांना असलेली कर्नाक ब्रिजची प्रतीक्षा आता संपली असून ‘सिंदूर पूल’ या नावाने या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी पुलाचं नाव बदलण्यामागचं कारण सांगताना मुख्यमंत्र्यांनी कर्नाक नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या जुलुमी वृत्तीचा उल्लेख केला. तसेच, प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेल्या इतिहासातील संदर्भही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल
दरम्यान, दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा मानला जातो. मध्य रेल्वेवर पूर्व व पश्चिम भागाला हा पूल जोडतो. जवळपास १० वर्षांपासून ही वाहतूक पुलामुळे प्रभावित झाली होती. हा पूल बंदर भाग, क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या भागांना जोडणारा असून यामुळे वालचंद हिरचंद मार्ग, भगतसिंह मार्ग जंक्शनवरील वाहतूकीची समस्या सुटणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘या पुलाची एकूण लांबी ३२७ मीटर असून त्यापैकी जवळपास ७० मीटरचं बांधकाम रेल्वेवर करण्यात आलं आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.
“मुंबई महानगर पालिकेनं अतिशय कमी वेळात या पुलाचं अतिशय उत्कृष्ट असं बांधकाम केलं आहे. विशेषत: रेल्वेवरचा पूल आणि दाटीवाटीचा भाग यामुळे त्यात अनेक अडचणी होत्या. पण जी काही वेळ दिली होती, त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यासाठी संबंधित सर्वांचं मी अभिनंदन करतो”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
काय आहे कर्नाक अधिकाऱ्याचा इतिहास?
दरम्यान, यावेळी ज्या अधिकाऱ्याच्या नावावरून या पुलाला कर्नाक म्हटलं गेलं, त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा इतिहासही देवेंद्र फडणवीसांनी नमूद केला. “अनेक वर्षं या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण ओळखत होतो. कर्नाक या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावानं हा ब्रिज होता. त्याचा इतिहास स्वकियांवर अत्याचार करणारा असा आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिला, त्यात प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापू असं एक प्रकरण आहे. त्यात या कर्नाकने कशा प्रकारे छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला प्रतापसिंह महाराज कसे पुरून उरले याचं वर्णन आहे”, असा संदर्भ यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिला.
“प्रतापसिंह महाराज, मुधोजीराजे यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा असा कर्नाक अधिकारी होता. या काळ्या इतिहासाची पानं पुसली पाहिजेत. मोदींनी सांगितलं होतं की इतिहासातील काळे अध्याय संपले पाहिजेत आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत. याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव बदलण्यात आलं. भारतीय सेनेने पहलगाम हल्ल्यानंतर अतुलनीय शौर्य गाजवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे हे दाखवून दिलं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी या पुलाचं नाव ऑपरेशन सिंदूरच्या नावावरून ‘सिंदूर’ ठेवण्याचा निर्णय घेतला”, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.