मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल येथील मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कार्यालयाच्या आवारातील उद्यानात शुक्रवारी एक धामण आढळले. धामण आढळल्याबरोबर सुरक्षा रक्षकांनी सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्रांनी धामण पकडले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. दरम्यान, एमएमआरसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात काही दिवसांपूर्वी घोणसचे एक पिल्लू सापडले होते. त्यालाही नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. धामण बिनविषारी असल्याने त्याच्यापासून धोका नाही, मात्र घोणस महाराष्ट्रातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे. घोणस एका वेळी ६ पेक्षा अधिक पिल्ले देते. एक पिल्लू आढळल्याने घोणसची उर्वरित पिल्ले आसपास असण्याची शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेची उभारणी एमएमआरसीकडून केली जात आहे. एमएमआरसीचे मुख्यालय बीकेसीत आहे. या बीकेसीतील मुख्यालयाच्या आवारातील उद्यानात शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास सुरक्षा रक्षकांना साप दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेक्शन ॲण्ड रेस्क्यू असोसिएशन या संस्थेशी संपर्क साधून सर्पमित्रांना पाचारण केले. अतुल कांबळे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र झाडात लपलेल्या सापाला पकडण्यासाठी अर्ध्या तास लागला. पकडण्यात आलेला साप धामण असल्याचे कांबळे यांनी सांगितले. धामण विषारी नसतो, मात्र तरीही नागरिकांना त्याची भीती वाटते.

धामण सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी एमएमआरसीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोणसचे एक पिल्लू आढळले होते. घोणस विषारी असल्याने आणि ती एकावेळी अनेक पिल्लांना जन्म देत असल्याने या परिसरात आणखी काही पिल्ले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

बीकेसीतील महिन्याभरात आढळले ६८ अजगर

मिठी नदीत, नदीलगत आणि नदीलगतच्या नाल्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर साप, अजगर आढळत आहेत. पावासाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने साप, अजगर रस्त्यावर येत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे. महिन्याभरात बीकेसीत ६७ अजगर आणि अजगरांची पिल्ले आढळल्याचे कांबळे यांनी सांगितले. तर घोणसची १२ पिल्ले, नागाची १० पिल्लेही आढळल्याचेही त्यांनी सांगितले.