मुंबई : विविध समाज माध्यमांचा रात्रंदिवस वापर घातक ठरू लागला आहे. समाज माध्यमांच्या दीर्घकालीन वापरामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून रात्री उशिरा मोबाइलचा वापर केल्यामुळे झोपेवर होणारा परिणाम मेंदूच्या ऱ्हासाचे एक कारण ठरू शकतो. यामुळे मज्जासंस्थेच्या पेशींचा हळूहळू ऱ्हास होऊन भविष्यात मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि अल्झायमर, पार्किन्सन, अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस असे आजार होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मेंदूला नैसर्गिक प्रकाशानुसार झोपेची वेळ समजते. सूर्यास्तानंतर वाढणाऱ्या मेलाटोनिन नावाच्या हार्मोनमुळे गाढ झोप येते. गाढ झोप मेंदू आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वाची वेळ असते. पण रात्री उशिरापर्यंत मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप स्क्रीनकडे बघितल्याने अद्याप दिवसच सुरू असल्याचा समज मेंदूचा होतो. त्यामुळे मेलाटोनिनचे स्रवण उशिरा होते आणि झोप लागली तरी ती गाढ झोप होत नाही. परिणामी, मेलाटोनिन पातळी पहाटेच्या सुमारासच जास्त होते. हे वर्षानुवर्षे सुरू राहिले, तर मेंदूला आवश्यक असलेली गाढ झोप मिळत नाही. त्यामुळे मेंदूची दुरुस्ती प्रक्रिया मंदावते आणि थकवा, झीज वाढू लागते. यामुळे अल्झायमर, पार्किन्सन आणि अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस अशा न्यूरोडिजेनेरेटिव्ह (मज्जासंस्थेच्या पेशींचा हळूहळू ऱ्हास होणे) आजार होण्याची शक्यता वाढते, अशी माहिती सैफी रुग्णालयाचे सल्लागार न्युरोलॉजिस्ट डॉ. आशिष गोसार यांनी दिली.
समाज माध्यमांवर रात्री वेळ घालवणे हे थेट अल्झायमर होण्यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले नसले तरी अस्वस्थ जीवनशैलीमुळे आजार होण्याचा धोका वाढतो, असेही डॉ. आशिष गोसार यांनी सांगितले. काही अभ्यासातून मध्यमवयीन आणि वृद्धापकाळातील स्क्रीन टाइममध्ये आरोग्याला धोका असल्याचे आढळून आले आहे. सर्व वयोगटातील लोक दिवसभर टेलिव्हिजन, संगणक, स्मार्टफोन, टॅब्लेट, आयपॅड इत्यादींसह अनेक स्क्रीनच्या संपर्कात असतात. यामुळे समाज माध्यमांवरील त्यांचा वेळ वाढतो. परिणामी नागरिकांना शारीरिक क्रियाकलापांमध्ये रस कमी होतो. स्क्रीनच्या संपर्कात दीर्घकाळ राहणाऱ्या मुलांच्या मेंदूवर परिणाम होऊन त्यांची गणितीय समस्या आणि मल्टी-टास्किंग करण्याची क्षमता कमी होते. साधारणपणे, रुग्णांना अलीकडील संभाषणे, घटना, त्यांनी काय खाल्ले यासारख्या बाबी विसरण्याने आजाराची सुरुवात होते. तसेच निर्णय घेण्याच्या समस्या, मल्टी-टास्किंगमध्ये अडचण, ओळखण्याच्या समस्यांमध्ये वाढ होते. त्यांच्या वर्तनात बदल आणि भाषेच्या समस्या निर्माण होतात. ही लक्षणे अल्झायमर या न्यूरोडीजनरेटिव्ह आजाराशी संबंधित असतात, अशी माहिती एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाचे न्यूरोसायन्सेन विभागाचे संचालक डॉ. अरुण शाह यांनी दिली.
समाज माध्यमांचा वापर समतोल कसा ठेवाल
- झोपेची शिस्त पाळा : ठराविक वेळी झोपणे, रात्री उशिरा स्क्रीन वापरणे टाळा.
- नियमित व्यायाम करा : शारीरिक हालचाल केल्याने हृदयासोबत मेंदूचेही आरोग्य सुधारते.
- समतोल आहार घ्या : फळे, भाज्या, प्रथिने यांचा आहारात समावेश करावा.
- दारू, सिगारेटपासून दूर रहा : याचा बौद्धिक क्षमतेवर घातक परिणाम होतो.
- आजारांवर नियंत्रण ठेवा : उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवा.