लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. तृतीय वर्ष ‘बीएमएस’च्या सीसीपीआर विषयात अनेक विद्यार्थ्यांना ‘०० आरआर’ गुण दिल्याचे प्रकरण ताजे असताना, आता तृतीय वर्ष विधी शाखेच्या (पाच वर्षांचा अभ्यासक्रम) पाचव्या सत्राच्या निकालापासून विविध विधी महाविद्यालयांमधील काही विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले आहे. विविध अभ्यासक्रमांच्या निकालांमधील त्रुटींमुळे मुंबई विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कारभारावर विद्यार्थी संघटनांकडून जोरदार टीका होत आहे.
तृतीय वर्ष विधी शाखेच्या पाचव्या सत्राची परीक्षा होऊन अनेक दिवस लोटले आहेत. मात्र विविध विधी महाविद्यालयांमधील काही विद्यार्थ्यांना पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल अद्याप मिळालेला नाही. आता तृतीय वर्ष विधी शाखेच्या सहाव्या सत्राची परीक्षा ३ ते २४ मे या कालावधीत होणार आहे. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून २५ मे ते १ जूनदरम्यान पाचव्या सत्राची एटीकेटीची परीक्षा घेण्यात येणार आहे. परंतु काही विद्यार्थ्यांचा पाचव्या सत्राचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
आणखी वाचा- मुंबई: खोट्या विम्याच्या माध्यमातून कर्ज घेऊन बँकेची सव्वाकोटींची फसवणूक
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे विधी शाखेच्या काही विद्यार्थ्यांचा पाचव्या सत्राचा निकाल जाहीर झालेला नाही असे कारण महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे. परंतु पाच वर्षांमधील नेमकी कोणत्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया प्रलंबित आहे याबाबत काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तर मुंबई विद्यापीठानेही आम्हाला कोणतेही ठोस कारण सांगितले नाही. जर परीक्षा देऊनही निकालापासून आम्हाला वंचित राहावे लागत असेल, तर कोणत्या विश्वासाने आम्ही मुंबई विद्यापीठाची परीक्षा द्यायची, असे मुंबईतील एका विधी महाविद्यालयामधील विद्यार्थिनीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत भरलेली वैयक्तिक व विषयासंदर्भातील माहिती त्याच दिवशी व्यवस्थितपणे का तपासली जात नाही? विद्यार्थ्यांनी बारकोड चुकीचा नमुद केल्याचे कारण मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून वारंवारपणे दिले जाते, याचा अर्थ सदर विद्यार्थी परीक्षेस हजर होते, मग त्यांना गैरहजर कसे दाखविले जाते. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाते. परंतु निकालानंतर हजेरीचा पुरावा सादर करण्याची सूचना विद्यार्थ्यांनाच करण्यात येते. ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांकडून का करून घेण्यात येत नाही, मुंबई विद्यापीठ आणखी किती काळ स्वतःच्या चुकांचे खापर विद्यार्थ्यांवर फोडणार आहे, असे प्रश्न मनविसेचे मुंबई विद्यापीठातील माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केले आहेत.
मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण
‘परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर बारकोड, बैठक क्रमांक, विषय कोड, पेपर कोड अशी वैयक्तिक व विषयासंदर्भातील चुकीची माहिती नमुद केल्यामुळे ती कोणत्या विद्यार्थ्याची आहे हे ऑनलाईन पेपर तपासणीमध्ये कळत नाही. यानंतर सदर उत्तरपत्रिका ऑफलाईन पद्धतीने पाहण्यात येते, यामुळे अशा विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात येतो. आता सदर उत्तरपत्रिका ऑफलाईन पद्धतीने पाहून सर्व प्रलंबित निकाल लवकरात लवकर लावण्याचा आमचा मानस आहे. विधी शाखेच्या काही विद्यार्थ्यांचा पाचव्या सत्राचा निकाल प्रलंबित असला तरीही त्यांना सहाव्या सत्राची परीक्षा देण्यास काहीच अडचण येणार नाही. तर प्रवेश प्रक्रिया प्रलंबित राहणे हा महाविद्यालयांचा प्रश्न आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचा पीआरएन क्रमांक व्यवस्थित आहे का? हे तपासायला हवे, असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिले.
