मुंबईच्या वाहतूक कोंडीत एकामागोमाग एक उभ्या असलेल्या बेस्टच्या बसगाडय़ा आणि त्या बसमध्ये बसून कंटाळलेले प्रवासी, हे चित्र बदलण्यासाठी बेस्ट प्रशासन, महापालिका, वाहतूक पोलीस, एमएमआरडीए यांनी एकत्र येत उपाय योजण्याचे ठरवले आहे. ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी’ (उम्टा) या प्राधिकरणाकडे याबाबतचा समग्र आराखडा अहवाल सादर करण्यात आला असून याद्वारे मुंबईतील रस्त्यांवर बेस्टच्या बससाठी विशेष मार्गिका राखीव ठेवण्यात येणार आहे. सुरुवातीला सात रस्त्यांवर गर्दीच्या वेळी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यात रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा मोठा अडसर असतो. बससाठी थांबलेल्या प्रवाशांना अर्धा-पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवासी बसकडे पाठ फिरवून शेअर रिक्षा किंवा टॅक्सीचा पर्याय निवडतात. गर्दीच्या वेळी बसगाडय़ा वेळेत आणि अधिक जलद गतीने पोहोचाव्यात, यासाठी ‘उम्टा’च्या बैठकीत बेस्टच्या गाडय़ांसाठी विशेष मार्गिका राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.
शहरातील सात रस्त्यांवर काही टप्प्यांत या मार्गिका राखीव ठेवाव्यात, असे सुचविण्यात आले आहे. या मार्गिका सकाळी आठ ते दुपारी ११ आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत राखीव ठेवल्या जातील. सध्या प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, हाजी अली-वरळी नाका, सुमन नगर (चेंबूर), पूर्व द्रुतगती महामार्ग येथील काही टप्पे बेस्टसाठी राखीव ठेवले जाणार आहेत.
हा प्रस्ताव सध्या वाहतूक पोलिसांकडे गेला असून सदर रस्त्यांवरील वाहतुकीच्या स्थितीचा आढावा घेऊन वाहतूक पोलीस याबाबत निर्णय घेतील. बेस्टचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे यापैकी काही रस्त्यांची पाहणी केली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच या रस्त्यांपैकी काही रस्त्यांवरील मार्गिका बेस्टसाठी राखीव असतील, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. एकटय़ा जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावर गर्दीच्या वेळी प्रत्येक तासाला १५६ बसगाडय़ांची वाहतूक सुरू असते. एखाद्या रस्त्यावर एवढय़ा जास्त प्रमाणात बसची वाहतूक होत असेल, तर राखीव मार्गिकांमुळे ही वाहतूक नक्कीच वेगवान होईल. त्याचा फायदा बेस्ट प्रशासनासह प्रवाशांनाही होणार आहे.