मुंबई : मुंबईपासून अवघ्या तास-दीड तास अंतरावर असलेल्या अलिबाग, घारापुरी या पर्यटनस्थळी जलमार्गे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र गेट वे ऑफ इंडियालगतच्या समुद्रातील स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस प्रवासी बोटींसाठी धोकादायक ठरू लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मच्छीमारांची जाळीही समुद्राच्या प्रवाहासह बोटीच्या पंख्यात अडकून दुर्घटनेची शक्यता वाढू लागली आहे. परिणामी, अलिबाग आणि घारापुरीसाठी सुरक्षित जलमार्ग निश्चित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – बेकायदा राजकीय फलकांची वाढती संख्या भयावह; राजकीय पक्षांना अवमान नोटीस बजावताना उच्च न्यायालयाची उद्विग्नता

गेली काही वर्षे अलिबाग आणि लगतच्या स्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. अलिबागच्या रस्ते प्रवासासाठी साडेतीन ते चार तासांचा अवधी लागतो. मात्र ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून सोडण्यात येणाऱ्या प्रवासी बोटींतून तास-दीड तासात अलिबाग गाठता येते. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला बोटीतून जाता येते. त्यामुळे शनिवार आणि रविवारी जलमार्गे अलिबाग आणि घारापुरीला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. तसेच नोकरी-व्यवसायासाठी समुद्रमार्गे मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ही मंडळी प्रवासी बोटींमधून नियमित प्रवास करतात.

‘गेट वे ऑफ इंडिया’-अलिबाग दरम्यान मालदार कॅटामरीन, पीएनपी मेरिटाईम सर्व्हीसेस, अजंता या कंपन्यांची, तर गेट वे ऑफ इंडिया- घारापुरी दरम्यान गेट वे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्था आणि ‘महेश टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ची प्रवासी बोट सेवा कार्यान्वित आहे. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी, नाताळची सुट्टी आणि आठवडाअखेरीस अलिबाग आणि घारापुरीला मोठ्या संख्येने पर्यटक जातात.

हेही वाचा – गणेशोत्सव मंडळाची बैठक निष्फळ; पीओपीला पर्याय देण्याची सार्वजनिक मंडळांची मागणी

दरम्यान, गेल्या काही वर्षे गेट वे ऑफ इंडिया येथून खासगी स्पीड बोट सेवा सुरू झाली असून अतिवेगाने धावणाऱ्या स्पीड बोटी अलिबाग, घारापुरीला जाणाऱ्या प्रवासी बोटींसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. स्पीड बोट चालकांकडून अनेकदा धोकादायक कसरती केल्या जातात. त्यांचा वेग, मार्ग यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. काही वेळा स्पीड बोटी प्रवासी बोटींच्या अगदी जवळून जातात. त्यावेळी प्रवासी बोटींना अडथळा निर्माण होतो. अनेकदा प्रवासी बोटींतील प्रवासीही धास्तावतात, असे एका प्रवासी बोटीच्या चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले.

जाळीचा अडथळा नेहमीचाच

मच्छीमार मंडळी समुद्रात मासेमारीसाठी जाळे पसरवून ठेवतात. काही वेळा पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाळे बोटींच्या मार्गात येते. मासेमारीचे जाळे बोटीच्या पंख्यात अडकते आणि बोट चालवणे अवघड बनते. अखेर बोटीच्या पंख्यात अडकलेले जाळे काढून पुढे मार्गस्थ व्हावे लागते. मात्र अशा वेळी प्रवाशांची धाकधूक वाढते. जलप्रवासातील हे वाढते धोके लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सदर प्रवासी बोट चालकाने केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed boat issue alibaug gharapuri safe waterway demand by tourists mumbai print news ssb