मुंबई : अर्थक्षेत्रावरील ताज्य घडामोडी वेग घेत असताना आर्थिक साक्षरतेबाबत पुढाकार घेणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रमाला मुलुंडकरांनी उत्सुर्फ प्रतिसाद नोंदविला. लक्षणीय उपस्थिती व गुंतवणूकविषयक नेमक्या शंका उपस्थित करून आपण सजग गुंतवणूकदार असल्याचीही या माध्यमातून दिली.
‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रमाच्या नव्या पर्वात पहिले गुंतवणूकपर मार्गदर्शन शनिवारी मुलुंड (पूर्व) येथील मराठा मंडळ सभागृहात झाले.
‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’च्या विक्री व विपणन विभागाचे मुंबई प्रमुख अमित मांजरेकर, अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी व आर्थिक सल्लागार तृप्ती राणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
‘म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ’ स्पष्ट करताना तृप्ती राणे यांनी फंड गुंतवणूक प्रकाराची माहिती, त्यातील प्रकार, परताव्याविषयी मार्गदर्शन केले. तर ‘अर्थनियोजनाचे महत्त्व’ विशद करताना कौस्तुभ जोशी यांनी पारंपरिक गुंतवणूक प्रकारासह सुनियोजित गुंतवणुकीने सुरक्षिततेसह अधिक परताव्याचा लाभ कसा पदरात पाडून घेता येतो यावर भाष्य केले. अमित मांजरेकर यांनीही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या शंकांचे समाधान केले. सुनिल वालावलकर यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
