खड्डय़ांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली असताना या खड्डय़ांचा आर्थिक फटका एसटीतील चालकांना बसला आहे. या खड्डय़ांमुळे दादर ते पनवेलदरम्यान चालवण्यात येणाऱ्या गाडय़ांची धाववेळ पाळणे चालकांसाठी अशक्य ठरत आहे. एसटीने या चालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचा पगार कापण्याचा ‘सुलतानी’ निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात  चालकांनी नेहरू नगर आगारात सोमवारी दुपारी अचानक संप केला. हा निर्णय कामगार करारातील धाववेळेबाबतच्या कलमाचे उल्लंघन करणारा असल्याने मोठय़ा प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.
सद्य’अवस्था’
दादर-पनवेल या दोन शहरांमधील सेवेसाठी एसटीने एक तास १० मिनिटे एवढी धाववेळ निश्चित केली आहे. या मार्गावर एकूण ४५ आणि १४ मोठे सिग्नल आहेत. प्रत्येक थांब्यावर प्रवासी चढण्यासाठी व उतरण्यासाठी एका मिनिटाचा कालावधी धरला, तरी धाववेळेतील ४५ मिनिटे वजा होतात. त्याशिवाय खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. कळंबोलीजवळ नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे, मुंब्रा येथील बायपास मार्ग खचल्याने सर्व वाहतूक या मार्गाने वळवली आहे. यामुळे या मार्गावरील गाडय़ांना पनवेलपर्यंत पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात, असे चव्हाण म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधकारण!
या मार्गावर प्रत्येक चालकाला तीन फेऱ्या कराव्या लागतात. मात्र सध्या दोन ते सव्वा दोन तास एकाच फेरीला लागत असल्याने चालक धाववेळ पाळू शकत नसल्याचा ठपका ठेवत एसटी प्रशासनाने या चालकांच्या पगारातील ७०० ते अडीच हजार रुपयांपर्यंतची रक्कम कापली. त्यामुळे संतप्त झालेल्या चालकांनी सोमवारी दुपारी अचानक कुर्ला नेहरू नगर आगारात आंदोलनाचे पाऊल उचलले. रस्त्यांतील खड्डय़ांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा भरुदड आमच्यावर का, असा प्रश्न या चालकांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus drivers protest after salary cut