मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त पाच हजार विशेष बस चालवण्यात येणार आहेत. या बस राज्यातील विविध भागातून मुंबईत दाखल होणार आहेत. परंतु, या बस पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून चालवण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. पथकरावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

एसटीचे नियोजन कसे?

यावर्षी गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी असून कोकणात गणेशोत्सवानिमित्त विशेष एसटी चालवण्यात येणार आहेत. शेकडो बसचे गट आरक्षण झाले असून बस उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाची आखणी सुरू आहे. जादा वाहतुकीसाठी प्रत्येक आगारात, प्रत्येक बससोबत वाहक पाठविला जाणार नसून आगाराच्या एकूण एसटीला दोन वाहक पाठविण्यात येतील. तसेच वाहकाबरोबर इटीआय मशिनसह जुन्या पद्धतीचा पुरेसा तिकीटसाठा देण्यात येणार आहे.

पथकरातून एसटीला सूट नाही

गणेशोत्सवाला एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असून, अद्याप गणेशोत्सवानिमित्त पथकरातून सूट देण्याबाबत राज्य सरकारद्वारे घोषणा झाली नाही. त्यामुळे एसटीला देखील ही सूट लागू नाही. परिणामी, राज्यातून सुमारे साडेचार हजार बस मुंबईत दाखल होतील. त्यामुळे महामार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक एसटीसाठी पथकर भरावा लागेल. त्यात एसटी महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. तो वाचवण्यासाठी जुन्या मार्गाचा पर्याय स्विकारण्यात आला आहे.

एसटीच्या निर्णयाला विरोध

राज्यातील विविध भागातून सुमारे साडेचार हजार बस मुंबईत दाखल होतील. त्या वेळेत पोहोचण्यासाठी पुणे-मुंबई नवीन महामार्गाचा वापर करणे आवश्यक आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून एसटी चालवून, पथकराचा खर्च कमी करण्याचा महामंडळाचा कल आहे. परंतु, जुन्या महामार्गावरून एसटी चालवून, इंधन खर्च वाढेल. त्यासह वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ता यामुळे वेळेचा अपव्यय होईल. त्यातच लांबचा पल्ला पार करून चालक आणि वाहकांना पुन्हा कोकणात सेवा द्यावी लागणार आहे. त्यामुळे चालक-वाहकांना आराम करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. परंतु, काही रुपयांच्या पथकरासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून एसटी चालवणे हा चुकीचा निर्णय आहे, असे बस फॉर अस फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित धेंडे यांनी सांगितले.

कुठून, किती एसटी बसचा ताफा मुंबईत दाखल होणार

मुंबई – ६०० बस

पुणे – १,२५० बस

छत्रपती संभाजीनगर – १,२५० बस

नाशिक – १,२७५ बस

अमरावती – ३२५ बस

नागपूर – २०० बस