मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या वादाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली. सुट्ट्या पैशावरून वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआयद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून मागील काही दिवसांपासून यूपीआयद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळू शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू यंत्र (एटीआयएम) दिले आहे. या यंत्राच्या माध्यमातून यूपीआयद्वारे तिकीट काढता येते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना यूपीआयचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने यूपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआयद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यूपीआयद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे द्यावेत, अशी सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना केली आहे. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरून वाद होणार नाहीत याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचनाही प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

यूपीआयद्वारे उत्पन्न (दर वाढण्यापूर्वी)

२१ जानेवारी – ८७.५८ लाख रुपये
२२ जानेवारी – ८६.५० लाख रुपये
२३ जानेवारी – ८४.२३ लाख रुपये
२४ जानेवारी – ६७.३६ लाख रुपये

यूपीआयद्वारे उत्पन्न (दर वाढल्यानंतर)

२६ जानेवारी – १.५३ कोटी रुपये
२७ जानेवारी – १.४६ कोटी रुपये
२८ जानेवारी – १.२५ कोटी रुपये
२९ जानेवारी – १.१९ कोटी रुपये
३० जानेवारी – १.२५ कोटी रुपये

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St mahamandal appeal passengers use upi to buy ticket to avoid disputes for coins and chillar issue mumbai print news css