राष्ट्रीय चित्रपट महामंडळ (एनएफडीसी) दरवर्षी २० चित्रपटांची निर्मिती करते. याच एनएफडीसीशी सामंजस्य करार करून वर्षांला दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि एनएफडीसी यांच्यात मराठी चित्रपटनिर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून या करारानुसार ५० लाख रुपयांचा निधी मराठी चित्रपटनिर्मितीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी बुधवारी एका कार्यक्रमात केली. आत्तापर्यंत केवळ मराठी चित्रपट निर्मात्यांना अनुदान देण्याइतपत मर्यादित भूमिकेत असलेले राज्य सरकार या करारानुसार आता थेट मराठी चित्रपटनिर्मितीत उतरले आहे.
६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी मारणाऱ्या अकरा मराठी कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा राज्य सरकारच्या वतीने ५१ हजार रूपये निधी देऊन सत्कार झाला होता. मात्र, पहिल्यांदाच एवढया मोठय़ा प्रमाणावर मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले असून त्यांना राज्य सरकारच्या वतीने एक लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार, दिग्दर्शक शिवाजीराव लोटन पाटील, अभिनेता विक्रम गोखले, अभिनेत्री उषा जाधव, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, संगीतकार शैलेंद्र बर्वे, निर्माती प्रतिभा मतकरी, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक गौरी पटवर्धन, विक्रांत पवार, अभिमन्यू डांगे आणि बालकलाकार हंसराज जगताप अशा अकरा कलाकारांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात देवतळे यांच्या हस्ते उर्वरित पुरस्कारप्राप्त रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2013 रोजी प्रकाशित
राज्य सरकार मराठी चित्रपटांची निर्मिती करणार
राष्ट्रीय चित्रपट महामंडळ (एनएफडीसी) दरवर्षी २० चित्रपटांची निर्मिती करते. याच एनएफडीसीशी सामंजस्य करार करून वर्षांला दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

First published on: 05-09-2013 at 02:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government will be produced the marathi film