अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवडय़ात आरोपपत्र दाखल केले असून त्यात त्यांनी जियाचा मित्र आणि अभिनेता आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे.
या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) वा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) पुन्हा तपास करण्याची मागणी करीत त्यासाठी उच्च न्यायालयात नव्याने याचिका करणार असल्याची माहिती बुधवारी जियाच्या आई राबिया खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिया अमेरिकी नागरिक असल्याने याप्रकरणी अमेरिकेच्या ‘एफबीआय’कडे सहकार्य करण्याची विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही, असे स्पष्ट करताना पोलिसांनी न्याय्यवैद्यक अहवाल तपासात कुठेच विचारात घेतलेला नाही. या अहवालानुसार जियाची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झालेले असतानाही आरोपीला वाचविण्यासाठी या अहवालाचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप राबिया यांनी केला. आपल्याला आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली नसल्याची खंत राबिया यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी गेल्याच आठवडय़ात जियाच्या आत्महत्येप्रकरणी ४४७ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात पुढे आलेल्या पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण हत्येचे नसल्याचेही नमूद करीत सूरजविरुद्ध जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. आणि याच दिशेने तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही मुंबई पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केलेला नाही. पुढील आठवडय़ात आपण या संदर्भात याचिका दाखल करू.
राबिया खान (जिया हिच्या आई)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj pancholi blame to force jiah khan suicide