अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचं गुढ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात सुशांत सिंहचे वडील के.के. सिंह यांनी घटनेनंतर मुंबई पोलिसांकडे नोंदवलेला जबाब समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीचं नावही घेतलं नव्हतं.
सुशांत सिंहचे वडील के.के. सिंह यांनी मुंबई पोलिसांकडे नोंदवलेला जबाब आता समोर आला असून, ‘आजतक’ यासंदर्भात वृत्त दिलं आहे. सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार १४ जूनच्या आधी सुशांतची प्रकृती बरी नव्हती. ७ जून रोजी त्यांची आणि सुशांतचं बोलणं झालं होतं. विशेष म्हणजे सिंह यांनी सुशांतनं आत्महत्या केल्याची शक्यताही व्यक्त केली होती.
“माझा मुलगा सुशांत मुंडन कार्यक्रमासाठी १३ मे २०१९ रोजी पाटण्याला आला होता. त्यावेळी आमची भेट झाली होती. १५ मे २०१९ रोजी सुशांतचा मुंडण कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तो तणावाखाली नव्हता. १६ मे रोजी तो मुंबईला निघून आला. मी त्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचो. तो उत्तरही द्यायचा. मी त्याला जास्त कॉल करत नव्हतो, कारण तो बहुतांश वेळा कामात व्यस्त असायचा. सुशांतच मला कॉल करायचा. तोच मला माझ्या तब्येतीविषयी विचारायचा. त्यानंतर सुशांतनं मला ७ जूनला कॉल केला होता. त्यावेळी मी त्याला बोललो होतो की तुला पाटण्याला येऊन खूप वेळ होऊन गेला आहे. तुला वाटत असेल, तर पाटण्याला ये. त्यावर त्याने बघतो असं सांगितलं. माझी तब्येत चांगली नाही. तब्येत चांगली झाल्यावर येईल,” असं सुशांतच्या वडिलांनी जबाबात म्हटलं आहे.
“मी पाटण्यातील घरी होतो आणि १४ जून रोजी २:३० वाजता टिव्हीवरून कळालं की, सुशांतनं आत्महत्या केली आहे.. त्यानंतर माझी शुद्ध हरपली व मला चक्कर येऊ लागली. मी माझा भाचा नीरज सिंह आणि काही नातेवाईकांना घेऊन मुंबईला पोहोचलो. सुशांतवर विले पार्लेमध्ये १५ जून रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास सुशांतवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर मी सुशांतच्या भाड्यानं घेतलेल्या वांद्रे येथील फ्लॅटवर गेलो. मी कुणाला काहीच बोललो नाही आणि विचारलंही नाही. माझ्या मुलानं आत्महत्या का केली? याची मला माहिती नाही. त्यानं माझ्यासोबत कधी तणावाविषयी चर्चा केली नाही. माझी सुशांत प्रकरणात कोणतीही शंका वा तक्रार नाही. मला वाटत सुशांतनं आत्महत्या केली असावी,” असं सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबदात म्हटलं आहे.