मुंबई : स्तन कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा करणे शक्य आहे. मात्र बऱ्याचदा स्तन तपासणीमध्ये फारच लहान गाठ असेल तर पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे तपासणीमध्ये स्तन कर्करोगाचे निदान वेळेत व्हावे यासाठी टाटा रुग्णालय व भाभा अणू संशोधन केंद्राकडून (बीएआरसी) एआय आधारित दोन ॲप विकसित करण्यात येत आहेत. या दोन ॲपच्या माध्यमातून कर्करोगाच्या सुरूवातीच्या टप्प्यातील गाठींचे निदान करणे शक्य होणार आहे. यामुळे स्तन कर्करोगग्रस्त महिलांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.
भारतातील एकूण कर्करुग्ण महिलांपैकी सुमारे ३० टक्के रुग्ण स्तन कर्करोगाचे आहेत. देशामध्ये २० ते २५ महिलांपैकी एका महिलेला कर्करोग होण्याचा धोका असतो. स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी यासारख्या उपचार पद्धतींमुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे होतात. त्यामुळे सोनोग्राफी व मॅमोग्राफीमध्ये करण्यात येणाऱ्या महिलांच्या स्तनाच्या तपासणीचा अचूक अहवाल मिळाल्यास तातडीने व वेळेवर उपचार करून स्तन कर्करोग बरा करणे शक्य होणार आहे.
ही बाब लक्षात घेत टाटा मेमोरीयल केंद्र व बीएआरसी संयुक्तरित्या एआयच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावरील स्तन कर्करोगाचे निदान करण्यासाठी दोन ॲप विकसित करीत आहेत. स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठी साधारणपणे महिलांची सोनोग्राफी व मॅमोग्राफी या दोन तपासणी केल्या जातात. सोनोग्राफीमध्ये संशयास्पद दिसल्यास मॅमोग्राफी करण्याचा डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. प्राथमिक स्तरावर असलेल्या कर्करोगाची गाठ बऱ्याचदा तपासणीतून सुटण्याची असते.
त्यामुळे अतिरिक्त तपासण्या कराव्या लागतात. यामध्ये होणाऱ्या विलंबाचा रुग्णांना फटका बसू शकतो. त्यामुळे सोनोग्राफी व मॅमोग्राफीच्या तपासणीचे सूक्ष्म विश्लेषण होऊन प्राथमिक स्तरावरच कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी टाटा रुग्णालयाकडून एआय आधारित ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती टाटा रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी यांनी दिली.
‘प्रेक्षा’ व ‘प्रज्ञा‘ करणार अचूक निदान
स्तन कर्करोग तपासणीसाठी सोनोग्राफी व मॅमोग्राफीचा अचूक अहवाल बनवून कर्करोगाचे निदान करण्यासाठी टाटा रुग्णालयाकडून ‘प्रेक्षा’ व ‘प्रज्ञा’ या दोन ॲपची निर्मिती करण्यात येत आहे. सोनोग्राफीच्या तपासणीसाठी ‘प्रज्ञा’ तर मॅमोग्राफीच्या तपासणीसाठी ‘प्रेक्षा’ हे ॲप विकसित करण्यात येत आहे. टाटा रुग्णालयामध्ये स्तन कर्करोगाच्या रुग्णांवर अद्यापपर्यंत केलेल्या उपचाराची माहिती आणि बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेले एआय आधारित तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून हे दोन्ही ॲप तयार करण्यात येत आहेत. हे दोन्ही ॲप पुढील सहा महिन्यांमध्ये रुग्णांच्या सेवेत येणार आहेत, अशी माहिती टाटा रुग्णालयातील ब्रेस्ट इमेजिंग विभागाच्या प्रमुख प्रा. पलक पोपट यांनी सांगितले.
राज्याच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होणार अहवाल
ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये सोनोग्राफी व मॅमोग्राफीचे अचूक अहवाल बनविणारे तंत्रज्ञ अनेकदा उपलब्ध नसतात. अशावेळी संबंधित रुग्णालय किंवा इमेजिंग केंद्रातील डॉक्टरांनी सोनोग्राफी व मॅमोग्राफीची माहिती ‘प्रेक्षा’ व ‘प्रज्ञा’ ॲपवर अपलोड केल्यास अवघ्या काही वेळात त्याचे अचूक निदान करून डॉक्टरांना अहवाल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या स्तन कर्करोगाचे निदान वेळेत होण्यास मदत होणार असल्याचे डॉ. सुयश कुलकर्णी यांनी सांगितले.