१४०० विद्युत बसगाडय़ांसाठीच्या निविदा प्रक्रियेला तूर्त स्थगिती नाही 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रिक) १४०० वातानुकूलित बसगाडय़ांसाठी काढलेल्या निविदा अपात्र ठरविण्याच्या ६ मेच्या बेस्टच्या निर्णयाला टाटा मोटर्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार देताना कंपनीच्या याचिकेवर बेस्टला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर मंगळवारी कंपनीच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने बेस्टला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी २३ मेला ठेवली.

 इलेक्ट्रिक बसगाडय़ांसाठी काढण्यात आलेल्या तांत्रिक निविदेतील बोली मनमानी पद्धतीने दुसऱ्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप टाटा मोटर्सने केला आहे. बेस्टने मुंबई शहरात वातानुकूलित विजेवर चालणाऱ्या १४०० बसेगाडय़ांसाठी (चालकासह) २६ फेब्रुवारीला दोन ई-निविदा जाहीर केल्या. त्यानंतर कंपनीने २५ एप्रिलला आपली तांत्रिक आणि आर्थिक बोली सादर केली.

तथापि, ६ मेला बेस्टने निविदेचे तांत्रिक योग्यता मूल्यमापन प्रकाशित केले आणि टाटा मोटर्सची बोली चुकीची घोषित केली. बेस्टचा हा निर्णय मनमानी असून निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी कंपनीने केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors appeals against best s decision in bombay hc zws
First published on: 19-05-2022 at 01:47 IST