मुंबई सेन्ट्रलपर्यंत पोहोचण्यास सव्वा तास उशीर
मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील दहिसर ते भाईंदर स्थानकांदरम्यान चर्चगेट दिशेच्या मार्गिकेवर ओव्हरहेड वायरला झालेल्या विद्युतपुरवठय़ाच्या समस्येमुळे बुधवारी दुपारी लोकल फेऱ्यांचा बोजवारा उडाला. याशिवाय मुंबई सेन्ट्रलपर्यंत येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसलाही त्याचा फटका बसल्याने ही गाडी सव्वा तास उशिराने पोहोचली. नियमानुसार तेजसला एक तास उशीर झाल्यास प्रवाशांना १०० रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे ‘आयआरसीटीसी’ला या एक्स्प्रेसमधून मुंबईत उतरलेल्या ६३० प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी आधी प्रवाशांना नुकसानभरपाईचा दावा करावा लागणार आहे.
दहिसर ते भाईंदरदरम्यान अप जलद मार्गावर बुधवारी दुपारी १२.१५ वाजता ओव्हरहेड वायरला होणाऱ्या विद्युतपुरवठय़ात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे लोकलचे गाडय़ांचे वेळापत्रक बिघडले. अर्धा तास गाडय़ा उशिराने धावत असल्याने स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. दहिसर ते मीरा रोडदरम्यान दुपारी १२.३० वाजता आणि मीरा रोड ते भाईंदरदरम्यान दुपारी दीडच्या सुमारास ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे आठ लोकल फेऱ्या रद्द करतानाच २५ पेक्षा जास्त फेऱ्या उशिराने धावल्या. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला.
नियम काय? : मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला येणारी तेजस एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा सव्वा तास उशिराने पोहोचली. त्यामुळे बोरिवली, मुंबई सेन्ट्रल स्थानकांत उतरणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला. ‘आयआरसीटीसी’कडून खासगी एक्स्प्रेस चालवताना नियमानुसार एक तास गाडी उशिरा पोहोचली तर प्रवाशांना १०० रुपये नुकसानभरपाई आणि अडीच तास किंवा त्यापेक्षा जास्त उशिराने गाडी पोहोचल्यास प्रवाशांना २५० रुपये नुकसानभरपाईची तरतूद आहे. तेजस एक्स्प्रेसमधून मुंबईत ६३० प्रवासी उतरले. त्यांनी नुकसान भरपाईचा दावा केल्यास १०० रुपये मिळतील. सहा महिन्यांच्या आत ही नुकसानभरपाई मिळू शकते.