मुंबई : महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील सेवेत काही काळासाठी बदल केले आहेत. या मार्गिकेवरील दोन्ही मार्गावरील मेट्रो गाड्या आजपासून गुंदवली – आरेदरम्यानच धावणार आहेत. तर मेट्रो ७ मार्गिकेवरील दोन्ही मार्गावर ओवरीपाडा – आरेदरम्यान एकेरी वाहतूक सुरू असणार आहे. मेट्रो सेवेतील हे बदल लक्षात घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे.
मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेच्या संचलनाशी संबंधित काही कामे एमएमएमओसीएलला करायची आहेत. या कामासाठी बराच कालावधी लागतो. ही कामे सेवा कालावधीत करण्यासाठी एमएमएमओसीएलने मेट्रो ७ मार्गिकेच्या सेवेत काही बदल केले आहेत. या मार्गिकेवरील दोन्ही मार्गावर काही गाड्या बुधवारपासून गुंदवली – आरेदरम्यान धावणार आहेत . तर मेट्रो ७ मार्गिकेवरील दोन्ही मार्गावर ओवरीपाडा – आरेदरम्यान एकेरी वाहतूक सुरू असणार आहे.
हे बदल काही काळासाठीच असणार आहेत, हे बदल तात्पुरते असल्याचेही एमएमएमओसीएलने स्पष्ट केले आहे. मात्र किती काळासाठी हे बदल राहतील हे स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेवरील दोन्ही मार्गावरील सेवा सुरळीत सुरू असणार आहे.