मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार – पालघर सागरी सेतू बांधणार आहे. वर्सोवा – विरार सागरी सेतूचा आराखडा याआधीच तयार करण्यात आला असून या आराखड्याचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. यामध्ये विरार – पालघर सागरी सेतूचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्सोवा – विरार – पालघर सागरी सेतूचा नव्याने आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून दोन कंपन्यांनी तांत्रिक निविदा सादर केल्या आहेत. त्याची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) वरळी-वांद्रे सागरी सेतूचा वर्सोव्यापर्यंत विस्तार करण्यात येत आहे. तर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचा विरारपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. मात्र आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात आला आहे. आता हा सागरी सेतू मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने कार्यवाही सुरू केली आहे. तर दुसरीकडे वर्सोवा – विरार सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत करण्याचा निर्णय २०२३ मध्ये घेण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबई : विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या औषधाच्या दुकानावर कारवाई; ८५ हजार रुपयांची ९१ प्रकारची औषधे केली जप्त

हेही वाचा – अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर चार दिवसांनी मॉरिसच्या पत्नीचा गौप्यस्फोट! म्हणाली, “मॉरिस व्हिलन…”

वर्सोवा – विरार सागरी सेतू ४२.७५ किमी लांबीचा आणि आठ मार्गिकांचा (येण्यासाठी चार, जाण्यासाठी चार) असणार आहे. या सागरी सेतूला चारकोप, उत्तन, वसई आणि विरार असे चार, एकूण ५२ किमीचे आंतरबदल मार्ग असणार आहेत, त्यामुळे वर्सोवा – विरार सागरी सेतू एकूण ९५ किमी लांबीचा प्रकल्प असणार आहे. तर वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार होणार असल्याने हा सागरी सेतू १० ते ११ किमीने वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प १०० किमीहून अधिक लांबीचा प्रकल्प असणार आहे. या सागरी सेतूसाठी ६३ कोटी ४२६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, वर्सोवा – विरार सागरी सेतूचा एमएसआरडीसीने आराखडा तयार केला होता. मात्र या आराखड्यास बरीच वर्षे झाल्याने त्याचे पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. त्यामुळे वर्सोवा – विरार – पालघर सागरी सेतूचा नव्याने आराखडा तयार करण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये निविदा जारी केल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून दोन निविदा सादर झाल्या आहेत. आर्वी असोसिएट आणि निप्पॉन कोई, जपान या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. त्यांची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत.