धवल कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाळेबंदीच्या काळात मच्छिमारांची अवस्थाही बिकट आहे. मत्स्य व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे. काही लहान बोटींद्वारे समुद्रात जाऊन मासे पकडण्याचा प्रयत्नही मच्छिमार बांधव करत आहेत. मात्र मच्छिमारांची अवस्था बिकट आहे. कफ परेड भागात मच्छिमार नगर येथे तर कमी झालेल्या प्रदुषणामुळे मासे किनाऱ्यावर येऊ लागले आहेत. या ठिकाणी राहणारे मच्छिमार हे गळ टाकून मासे पकडू लागले आहेत. मात्र पकडेलेले मासे विकायचे कुठे? हा प्रश्न या सगळ्यांसमोर आ वासून उभा आहे. मासे विक्री होत नसल्याने या सगळ्यांचा आर्थिक व्यवहार बंद झाल्यात जमा आहे.

या सगळ्या परिस्थितीमुळे व्यवसायातील मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत दूर करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजारांमध्ये सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून मासे विक्रीस संमती द्यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती चे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे.

तांडेल म्हणाले की सध्या दोन ते तीन सिलिंडर असलेल्या व चारच्या आसपास खलाशी असलेल्या बोटी समुद्रामध्ये मासेमारीसाठी जात आहेत. पण पकडलेले मासे नेमके विकायचे कुठे हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. सध्या हे मासे कोळी वाड्यांमधील मासळी बाजारांमध्ये विकले जातात. मात्र हे मासे मुंबईकरांना सुद्धा मिळावेत आणि मासेमारी करणाऱ्यांचे आणि मासे विकणाऱ्यांचे उत्पन्न पुन्हा सुरु होणे आवश्यक आहे.

सरकारच्या निदर्शनास या सगळ्या गोष्टी वारंवार आणून देऊनही यासंदर्भात कोणताही स्पष्ट निर्णय घेतला जात नाही अशी खंत तांडेल यांनी व्यक्त केली. उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि मत्स्य व्यवसाय खात्यांमधील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो असंही त्यांनी म्हटलं आहे.  केंद्र सरकारच्या आदेशानुसार मासेमारी करता येऊ शकते असा मोघम आदेश देण्यात आला आहे पण यात कुठलीही स्पष्टता नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने साधारणपणे शंभर मार्केटमध्ये मासे विक्रीला परवानगी दिली आहे. तिथे पुन्हा मासे विक्री करणाऱ्या महिलांना बसण्याची परवानगी द्यावी. अर्थात असे करताना सुद्धा सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करण्यात यावे. एखाद्या मार्केटमध्ये जर समजा तीनशे महिलांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली गेली असेल तर एकाच वेळेला या सर्वांना तिथे विक्री करु न देता त्यांना शिफ्टमध्ये ड्युटी द्यावी. त्याचबरोबर क्रॉफर्ड मार्केट, भाऊचा धक्का आणि ससून गोदी सारख्या होलसेल बाजारपेठांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, तिथे विक्रीची परवानगी देण्यात येऊ नये.

महाराष्ट्रामध्ये साधारणपणे १७ हजार च्या आसपास होड्या आहेत ज्यांचा वापर मच्छीमारीसाठी केला जातो. यापैकी अंदाजे साडेतेरा हजार बोटी यांत्रिकी स्वरूपाच्या आहेत.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये समुद्रातील प्रदूषण कमी होऊन मासे किनाऱ्यावर येत आहेत. हा चांगला संकेत आहे. मात्र प्रदूषणाचा एकूणच समुद्रातील जीव सृष्टीवर आणि मासेमारीवर होणाऱ्या परिणामांचा सरकारने विचार करून या दृष्टीने पावले उचलावीत अशी सूचना सुद्धा तांडेल यांनी केली.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The government should allow the sale of fishes with social distancing demands damodar tandel dhk