आजकाल उत्तरायुष्यातच नव्हे, तर जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाला एकाकीपण खायला उठू शकतं. याचं कारण दिवसेंदिवस त्याचं आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं आणि व्यामिश्र होत चाललं आहे. सशाच्या काळजाचा माणूस त्याने कोसळून पडू शकतो. मावळतीची किरणं माणसाला या एकट्या, एकाकीपणातून विकल करू शकतात. विभक्त कुटुंब पद्धती, एकच एक मूल असण्याचा ट्रेंड आणि ते मूल शिक्षण वा व्यवसायानिमित्त दूरदेशी गेलं की येणारं रिकामपण, भेडसावणारी एकलेपणाची व्यथा, व्यक्तिवादाच्या अतिरेकानं कुटुंबीयांशी, समाजाशी तुटलेला संवाद, जोडीदाराच्या अकाली जाण्यातून, उठसूठ अहंगंडातून घटस्फोट घेण्याच्या तिरमिरीतून येणारं एकटेपण… अशा नाना कारणांनी माणसं हल्ली एकटी, एकाकी पडत चालली आहेत. त्यातून अनेक मनोकायिक समस्या उद्भवत आहेत. मनोविकारतज्ज्ञांकडे वाढलेली गर्दी हेच दर्शवतेय. पण यासाठी मुळात आपल्यातच सुधारणा घडवून आणल्याखेरीज यावर कायमस्वरूपी उपाय निघणार आहे का? या सामाजिक समस्येकडे निर्देश करणारं गजेंद्र अहिरे लिखित- दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक अलीकडेच रंगभूमीवर आलं आहे. काही वर्षांमागेही एकदा ते येऊन गेलं होतं.

विमल बर्वे या प्रौढत्वाकडे झुकलेल्या, नवऱ्याच्या जाण्याने आणि मुलाच्या (रंजन) परदेशातील वास्तव्यामुळे एकटंच आयुष्य जगणारी स्त्री. नवरा प्रशासकीय सेवेत दाबून पैसा खाऊन, बाहेरख्याली जिंदगी जगून आणि मजबूूत प्रॉपर्टी वगैरे करून मरून गेलेला.

त्याबद्दलची एक विलक्षण तीक्ष्ण चीड विमलच्या मनात वसत असलेली. त्याच्या पश्चात तिने आपल्या बंगल्यातील एक रूम विनया नावाच्या तरुण फोटोग्राफर मुलीला भाड्याने दिलेली. राहुल नावाचा बॉयफ्रेंड तिला आहे. व्यवहारवादी, प्रगतीची महत्त्वाकांक्षा बाळगणारा. विनया काहीशी रोमॅन्टिक, हॅपी गो लकी जगू इच्छिणारी. सुधीर ससाणे हे त्याच परिसरात राहणारे एकटे गृहस्थ. बायको गेलेली. मुलगी लग्न होऊन दिल्लीत स्थायिक झालेली. स्वाभाविकपणेच ससाणे यापुढच्या आयुष्याचं करायचं काय, या विवंचनेनं त्रस्त झालेले. एकाकीपण त्यांना घेरून आलेलं. आरती ही वंध्यत्व असलेल्या आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन स्व-तंत्र आयुष्य जगत असलेली मध्यमवयीन स्त्री. ती पॉटरी वगैरेंत मन रमवत असते. आपलं आपण मस्त आयुष्य जगतोय हा तिचा समज. पण तरीही तिला अधूनमधून एकटेपण सतावत असलेलं. त्यावर ती सोशल मीडियावर आपले तरुणपणीचे फोटो टाकून ‘मित्र’ गोळा करण्याचा उद्याोग करतेय. त्यात तिला मजाही येतेय. ही विमलची शेजारीण.

एकदा रस्त्यावरच्या भाजीवालीकडून भाजी घेताना पैसे सुटे नसल्याने ससाणे विमलचे पैसेही देतात आणि ते पैसे परत करण्यासाठी ससाणेंच्या घरी गेलेल्या विमलचा त्यांच्याशी परिचय होतो. आणि तो निरनिराळ्या कारणास्तव वाढतच जातो. एव्हाना विमलच्या मुलानं तिला अमेरिकेत बोलावलेलं असतं. ती पासपोर्ट, व्हिसाची तयारीही करत असते. दरम्यान, ते दोघं परस्परांत मनानं गुंतत जातात. विशेषत: ससाणे. त्यांच्या एकाकी आयुष्यात विमलच्या रूपानं हिरवळ आलेली असते. विमलचा मुलगा तिला घ्यायला येतो तेव्हा मात्र ती त्याच्याबरोबर जाण्यास नकार देते. ससाणेंमुळेच आई यायला राजी नाही हे कळल्याने रंजन वैतागतो. तो ससाणेंकडे जाऊन भांडण काढतो.

इकडे आरतीचे सोशल मीडियावरचे ‘मित्र’ तिला भेटायची इच्छा व्यक्त करतात. हे भलतंच काय घडतंय या जाणिवेनं आरती अस्वस्थ होते. तिला असलं काही नको असतं…

विनयाच्या बॉयफ्रेंडलाही एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर येते. पण त्या बदल्यात त्याने आपल्याशी लग्न करावं असा प्रस्ताव तो देणारी तरुणी त्याच्यासमोर ठेवते. विनया राहुलला आपल्या नात्यातून मोकळा करते आणि…

अशा एकटेपणाच्या नाना परी ‘शेवग्याच्या शेंगा’मध्ये आपल्यासमोर उलगडत जातात. त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहायला प्रत्यक्ष नाटक पाहणंच योग्य.

गजेंद्र अहिरे यांनी सिनेमॅटिक पद्धतीनं हे नाटक रचलं आहे. अनेक स्थळं, अनेक छोटे छोटे प्रसंग… त्यात अडकलेली माणसं… त्यांच्यातले परस्परव्यवहार. मनुष्यस्वभावाचे नाना नमुने त्यांतून आपल्यासमोर येतात. आणि आपण त्यात गुंतत जातो. लेखकाने एका साच्यातली माणसं उभी न करता त्यांचं त्यांचं वेगळं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा चित्रित केल्या आहेत. त्यात एक ताजेपण आहे. जीवनसन्मुखता आहे. जगण्याकडे पाहण्याचा आपला आपला दृष्टिकोन आहे. त्यातून त्यांचं जगणं उलगडत जातं. दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरे यांनी या पात्रांना परस्परांसमोर उभं करून त्याद्वारे नाट्य घडवलं आहे. काहीएक अपवाद करता त्यात प्रेडिक्टेबिलिटी नाहीये. प्रसंग मांडणीत मात्र सिनेमॅटिक तंत्रामुळे स्थळांची कसरत करावी लागली आहे. पात्रं मात्र ठोसपणे उभी राहतात… त्यांच्या त्यांच्या वैशिष्ट्यानिशी. नाटकाच्या उत्कर्षबिंदूपाशी आशयाशी संबद्ध एकाकीपणाची तरल संवेदना अधोरेखित होते. स्वत:च लेखक असल्याने त्यांना आपल्याला काय नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे हे माहीत असल्याने सादरीकरणात ते स्पष्ट, स्वच्छ जाणवतं.

नितीन नेरुरकर यांनी अनेक स्थळांची मागणी करणारं व्यामिश्र नेपथ्य वास्तवदर्शी, सांकेतिक आणि सूचकतेतून ते साकारलं आहे. शीतल तळपदे यांनी झरझर बदलणारे घटना-प्रसंग सुयोग्य प्रकाशयोजनेतून समूर्त केले आहेत. तन्मय भिडे यांचं संगीत- गाणी तसंच पार्श्वसंगीतातून लक्षणीय भूमिका निभावतं. फुलवा खामकर यांचं नृत्यआरेखन नाटकाची मागणी पुुरवणारं. संदीप नगरकर यांची रंगभूषा आणि देविका काळे यांची वेशभूषा पात्रांना बाह्यरूप प्रदान करते.

यातल्या सगळ्याच कलाकारांनी मन:पूत कामं केली आहेत. विमल बर्वेंच्या भूमिकेत स्पष्टवक्ती, नि:स्पृहतेचा आग्रह धरणारी, त्याबद्दल काहीएक तोरा असणारी स्त्री ऐश्वर्या नारकर यांनी तडफेनं साकारली आहे. त्यांनी विनोदाची सूक्ष्म जाण आणि भानही नेमकेपणानं दाखवलं आहे. अविनाश नारकरांनी सुधीर ससाणेंचं असह्य एकाकीपण, त्यांची तगमग, मध्यमवर्गीय नैतिकतेचं पापभिरू वर्तन उत्कटतेनं दर्शवलं आहे. सरळमार्गी मनुष्याचं यथार्थ दर्शन त्यातून घडतं. उच्छृंखलतेकडे झुकणारी, पण वाकड्या मार्गास जाण्यास घाबरणारी, बोलघेवडी आरती- नंदिता पाटकर यांनी छानच वठवली आहे. त्यांचा उत्स्फूर्त वावर, बेधडक असणं त्यांनी उत्कटतेनं दाखवलंय. तरुण असूनही विवेकी, सरळमार्गी, बिनगुंतागुंतीचं आयुष्य जगू पाहणारी विनया- अपूर्वा गोरे यांनी संयमिततेनं उभी केली आहे. अंकिता दीप्ती यांनी ऋजू, भाजीवाली, झारा आणि बॅन्क मॅनेजर अशा चौफेर भूमिका चोख बजावल्या आहेत. राहुल आणि रंजनचं परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व साकार देसाई यांनी यथातथ्य साकारलंय.

एकुणात, एकलेपणाचं तरल दु:ख मांडणारं हे नाटक रंजनाबरोबरच अंतर्मुखही करतं.