शैलजा तिवले
करोनाकाळात घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय आणि विक्रोळीचे क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय या पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांची धुरा सांभाळणाऱ्या तीन रणरागिणींनी करोना संसर्ग झाला, तरी एकीकडे रुग्णालयांची जबाबदारी आणि दुसरीकडे आपल्या बाधित कुटुंबाची काळजी, अशा दुहेरी पातळीवर करोनाशी समर्थपणे लढा दिला. विशेष म्हणजे ५० वर्षांवरील असूनही या तिघीजणी करोनाकाळात रुग्णालयात कार्यरत आहेत.
राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर (५५) यांना १९ जुलैला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सौम्य लक्षणे असल्याने त्या घरीच विलगीकरणात होत्या. त्यांचे पती आणि मुलीलाही बाधा झाली होती. मात्र, २६ जुलैला तिघांचीही लक्षणे गंभीर झाल्याने त्यांना ‘सेव्हन हिल्स’मध्ये दाखल केले गेले. या काळातही डॉ. ठाकूर यांचे काम दूरध्वनीच्या माध्यमातून सुरूच होते.
‘‘आजाराची भीती सुरुवातीला होती. पालिकेच्या रुग्णालयावर पूर्ण विश्वास असल्याने मी इथे दाखल झाले. त्यावेळी १०० खाटांच्या करोना रुग्णालयाची जबाबदारी तर होतीच. याशिवाय दुरुस्तीची अनेक प्रलंबित कामे रुग्णालयांत सुरू होती. त्यामुळे सतत फोनवरून कामाबाबत मार्गदर्शन, सूचना देणे चालू होते. याचा एक फायदाही झाला. मला फारसे एकटे वाटले नाही. गेल्या आठवडय़ात बरी होऊन घरी आले. रुग्णालयात जाण्याची फार इच्छा आहे. परंतु घरीच आराम करण्याची सक्ती असल्याने जाता येत नाही. माझे काम मात्र थांबलेले नाही’’, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
मुंबईत टाळेबंदी लागू झाल्यापासून गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अलका माने (५६) या घरापासून दूर होत्या. त्या करोनाशी झुंजच देऊन परतल्या, असे म्हणायला हरकत नाही. उच्च रक्तदाब असलेल्या डॉ. माने यांची प्रकृती गंभीर झाल्यावर त्यांना गोवंडी शताब्दीमधून २५ मे रोजी जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात हलविण्यात आले. न्यूमोनियासह त्यांच्या फुप्फुसात संसर्ग पसरला होता.
‘‘जिवाला धोका आहे याची कल्पना होती, परंतु त्यातूनही संयम ढळू द्यायचा नाही, हे मनाशी ठरविले. घर दूर असल्याने मुंबईत भावाकडे राहात होते. माझ्यामुळे त्याला आणि भाचीलाही बाधा झाली. भावाला अन्य अनेक आजार असल्याने त्याची चिंता अधिक होती,’’ असे डॉ. माने यांनी सांगितले.
‘‘रुग्णालयात ऑक्सिजनवर असल्याने फोनवरून कामे शक्य नव्हती. घरी परतल्यावर मात्र पुन्हा लगेचच कामे पूर्ववत सुरू केली. जूनमध्ये पुन्हा रुजू झाले. मार्चपासून माझे पती नवी मुंबईच्या घरी एकटे राहतात. घर सोडून राहिल्याने एकीकडे त्यांची काळजी असते आणि दुसरीकडे रुग्णालयाचे कामकाज, अशी दोन्हीकडे कसरत चालू असते. आता पुन्हा भावाकडे राहण्याची हिंमत होत नसल्याने मी सध्या हॉटेलमध्ये राहात आहे,’’ असे डॉ. माने सांगतात.
‘विचार करण्यासाठी सवड नाही!’
विक्रोळीच्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पद्मश्री अहिरे (५३) सांगतात की, टाळेबंदी आणि करोना यात रुग्णालयातील कामाचा ताण तर आहेच, शिवाय स्त्री म्हणून कुटुंबाच्याही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. घरातले सर्व आवरून रुग्णालयात जाणे, तेथून रात्री उशिरा घरी येणे, अशी सततची धावपळ सुरूच होती. २२ जूनला माझ्यासह मुलाला करोनाचे निदान झाले. घरीच विलगीकरणात होते. रुग्णालयाची प्रशासकीय कामे फोनवर, व्हॉट्सअॅपवर नेहमीप्रमाणे सुरू होती. सुरुवातीला भीती वाटली होती. परंतु काम सुरू असल्याने विचार करण्यासाठीही वेळ मिळत नव्हता, असा अनुभव अहिरे यांनी सांगितला.