नागपूरच्या प्राणिसंग्रहालयातील अडीच वर्षांचा नर महिनाअखेर बोरिवलीत

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये लवकरच नवीन सदस्य दाखल होणार आहे. नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बंदिस्त असलेल्या अडीच वर्षांच्या नर वाघाला मार्च महिन्याच्या अखेपर्यंत राष्ट्रीय उद्यानात आणले जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना या व्याघ्र प्रकल्पात नवीन वाघ पाहता येणार आहे. मध्य प्रदेशामधून महाराष्ट्राच्या तुमसर तालुक्यात दाखल होत परिसरात निर्भीडपणे वावर करणाऱ्या वाघाला वनविभागाने डिसेंबर महिन्यात जेरबंद केले होते. गेल्या दोन महिन्यांपासून हा वाघ गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बंदिस्त आहे.

सद्य:स्थितीत राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सात वाघ अस्तिवात आहेत. त्यामध्ये तीन नर नसून चार माद्या आहेत. माद्यांमध्ये १३ वर्षांची बसंती ही वृद्ध मादी असून तिची मुलगी लक्ष्मीदेखील या ठिकाणी आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आणण्यात आलेल्या मस्तानी आणि बिजली या माद्यादेखील व्याघ्र प्रकल्पामध्ये नांदत आहेत. नर वाघांमध्ये बाजीराव नावाचा वृद्ध पांढरा वाघ असून आनंद आणि यश नावाचे सात वर्षांचे दोन वाघ आहेत. मात्र भविष्यकाळातील व्याघ्र प्रकल्पाचा विचार करून नव्या वाघाला आणण्याची लगबग सध्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी करीत आहेत. त्यासाठी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बंदिस्त असणाऱ्या तरुण वाघाची निवड करण्यात आली आहे. २१ मार्च रोजी असणारा जागतिक वनदिन साजरा केल्यानंतर राष्ट्रीय उद्यानाचे विशेष पथक या वाघाला घेण्यासाठी नागपूरला रवाना होणारा असल्याची माहिती मिळते आहे.

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बंदिस्त असणारा वाघ हा मुळातच शांत स्वभावाचा आहे. आमच्या पथकाने प्रत्यक्षात भेट देऊन वाघाची पाहणी केली असून वाघाच्या हस्तांतरणाबाबत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाच्या सिंह आणि व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य अधीक्षक शैलेश देवरे यांनी दिली.

तसेच वातावरणातील उष्मा वाढण्याच्या आधी वाघाला आणणे आवश्यक असल्याने मार्च अखेरीपर्यंत उद्यानात वाघ दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतुकीदरम्यान दक्षता

वन्यजीवांची वाहतूक करताना विशेष मागदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते. वन्यजीवांची विशेष करून वाघासारख्या प्राण्याची वाहतूक करताना दर दोन तासाने प्राण्याला पाणी पाजणे आवश्यक असते. प्रवासादरम्यान वाहनाच्या वेगाच्या मर्यादेचे पालनदेखील केले जाते. तसेच काही तासांसाठी वाहन थांबवून प्राण्याला आराम देणे गरजेचे असते. प्रवासावेळी त्याच्या खाण्याच्या वेळादेखील सांभाळणे आवश्यक असतात.

पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आणण्यात आलेल्या दोन वाघिणींच्या प्रवासाचा टप्पा राष्ट्रीय उद्यानाच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केला होता.त्यामुळे नव्या वाघाला आणतानादेखील या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्या पद्धतीने पालन केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लग्नमंडपात घुसखोरी

राष्ट्रीय उद्यानात दाखल होणाऱ्या या नव्या वाघाचा इतिहास अतिशय रंजक आहे. मध्य प्रदेशातील मासूलखापा गावातील लग्नाच्या मंडपात हा वाघ शिरला होता. मात्र मुळातच शांत स्वभावाचा असल्याने त्याने कोणत्याही प्रकारचा धुमाकूळ या ठिकाणी घातला नव्हता. त्यानंतर साधारण १० डिसेंबर रोजी या वाघाने बावनथडी नदी ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला. तेव्हापासून हा वाघ भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर तालुक्यात वावरत होता. तसेच एका मजुराचा जेवणाचा डबादेखील या वाघाने पळविला होता. २२ डिसेंबर रोजी सीतासावंगीजवळील चिखला येथील झुडपांमध्ये बसला असताना वनविभागाने त्याला बंदिस्त केले. त्यानंतर त्याची रवानगी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात करण्यात आली.