गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
मुंबई : गेले काही दिवस भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला (राणीची बाग) पर्यटकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून राणीच्या बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. मुंबईत करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे आता राणीच्या बागेतील पर्यटनाच्या वेळेवर मर्यादा घालण्यात आली आहे. एरव्ही राणीच्या बागेचे प्रवेशद्वार दुपारी ४ वाजता बंद करण्यात येत होते. मात्र आता ते दुपारी ३ वाजताच बंद करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. रविवारीदेखील उद्यान परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. सध्या करोना संसर्गाने डोके वर काढल्यामुळे लागू केलेले कठोर निर्बंध लक्षात घेऊन पोलिसांनी पर्यटकांना उद्यानाच्या बाहेरच थोपवले. गर्दीमुळे रविवारी दोन वेळा बागेचे दार बंद करावे लागले. परिणामी, राणीच्या बागेत सफर करण्याऐवजी अनेकांना घरची वाट धरावी लागली.
१६ हजार पर्यटकांनी शनिवारी राणीच्या बागेला भेट दिली. रविवारीही अंदाजे इतकेच पर्यटक राणीच्या बागेत आले होते. परंतु दुपारच्या वेळी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन अखेर उद्यान प्रशासनाने पर्यटनाच्या वेळेवर मर्यादा घारण्याचा निर्णय घेतला. एरव्ही पर्यटकांसाठी दुपारी ४ वाजता बंद होणारे राणीच्या बागेचे प्रवेशद्वार आता दुपारी ३ वाजताच बंद करण्यात येणार आहे. तर दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश केलेल्या पर्यटकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत राणीच्या बागेतून बाहेर काढावे अशी सूचना संबंधितांना करण्यात आली आहे.
गर्दी सर्वत्रच
सध्या सुट्टीच्या दिवशी मुंबई आणि आसपासच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी राणीची बाग, लहान मुलांसाठीच्या इतर बागा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चौपाटय़ा, उपाहारगृहे या ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली आहे.
पर्यटक प्रतिसाद वाढत असला तरी आपण योग्य ती काळजी घेत आहोत. यापुढे सुट्टय़ांच्या दिवशी विशेष काळजी घेतली जाईल. आपण केवळ एकच तास कमी केलेला आहे. कारण दुपारी ४ वाजता बागेत गेलेल्या पर्यटकाला बाहेर येण्यास किमान दोन तासांचा अवधी लागतो. जमावबंदीचे नियम लक्षात घेऊन आपण ३ वाजता दार बंद करून सायंकाळी ५ पर्यंत बाग रिकामी करणार आहोत.
– डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीर जिजामाता भोसले, उद्यान व प्राणिसंग्रहालय